Wed, Jul 17, 2019 20:28



होमपेज › Marathwada › मराठवाड्यात पवारनीती : निष्ठावंत अलगद बाजूला, घराण्यांमध्ये फूट पाडण्यात यश

मराठवाड्यात पवारनीती : निष्ठावंत अलगद बाजूला, घराण्यांमध्ये फूट पाडण्यात यश

Published On: Aug 06 2018 8:14AM | Last Updated: Aug 06 2018 8:14AM



मराठवाड्यात पवारनीती शरद पवार आणि मराठवाड्यातील राजकारण याचा विलक्षण संबंध आहे. जसे पश्‍चिम महाराष्ट्रात शरद पवारांना एकनिष्ठ सहकारी मिळाले तसे मराठवाड्याने देखील त्यांना सहकारी दिले आहेत. आज मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांत नसले तरी काही ठिकाणी मात्र पवारांना भक्‍कम सहकारी आणि त्यांना यश मिळालेले आहे. बीड, उस्मानाबाद ही दोन जिल्हे राष्ट्रवादीची प्रमुख गड मानले जातात. लातूर नांदेड या जिल्ह्यांत राष्ट्रवादीला फारसे यश मिळवता आले नाही, तर औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यांत हा पक्ष विस्ताराची संधी शोधतो आहे.

मराठवाडा : सुशील कुलकर्णी

औरंगाबाद जिल्ह्यात सतीश चव्हाण, मधुकरअण्णा मुळे, संजय वाघचौरे, बी. आर. पाटील आणि यांसारखी मंडळी पवारांचा झेंडा खांद्यावर घेऊन चालत आहेत. यातील मधुकर मुळे यांना उतारवयात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावरून पायउतार व्हावे लागले. त्यांना बाजूला करण्यात सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके या अजित पवार समर्थकांचाच मोठा हात आहे. मधुकर मुळे यांनी अनेक वर्षे पवार निष्ठेचा झेंडा खांद्यावर घेतला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यतिरिक्‍त मुळे यांचा अन्य कोणत्या राजकारणात सहभाग देखील नव्हता, मात्र अजित पवार समर्थकांनी मुळे यांना पदावरून दूर करत त्यांच्या पक्ष भक्‍तीचे फळ त्यांना दिले आणि शरद पवार मात्र केवळ पाहत राहिले. अर्थात पवारांची ‘नरो वा कुंजरो वा’ ही नेहमीची सोयीच्या वेळेची भूमिका असते. मुळे नाराज झाले तर नुकसान काहीच नाही, हे समजल्यावर पवारांनी अजित पवार यांना पुढे करत मुळेंना अलगद दूर केले.

बीडमध्ये काही वेगळे घडलेले नाही. जयदत्त क्षीरसागर हे त्यांच्या मातोश्री स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांच्या काळापासून राष्ट्रवादीचे एकनिष्ठ राहिले आहेत. मायक्रो मायनारिटी असूनदेखील क्षीरसागरांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर जिल्ह्यात आपले पाय रोवले, पण राष्ट्रवादीने त्यांना संधी देत त्यांना आपले पंख विस्तारता येणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेतली. सुरुवातीला क्षीरसागर यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विनायक मेटे यांचा वापर केला. मेटेंना राजकीय पदे दिली. एक काळ तर जयदत्त क्षीरसागर आणि विनायक मेटे यांना पक्षसंघटनेत समान पदावर ठेवून क्षीरसागरांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न झाला. मेटेंकडून क्षीरसागर नियंत्रित होत नाहीत; हे लक्षात आल्यावर अमरसिंह पंडित यांचे महत्त्व वाढविण्यात आले. विधान परिषदेतील पहिलीच टर्म उपभोगणार्‍या धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेतेपद दिले, पण अनेक वेळा आमदार राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केले. मोदी लाटेत सगळा जिल्हा पराभूत झालेला असताना पक्षाचा झेंडा लावून धरणारे आणि विजय मिळविणारे जयदत्त क्षीरसागर कोणत्याच मार्गाने बधत नाहीत, हे लक्षात आल्यावर गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी वापरलेले हत्यार क्षीरसागरांच्या घरी वापरण्यात आले. क्षीरसागरांच्या घरातच फूट पडली. जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू रवींद्र आणि पुतण्या संदीप यांच्या बंडाला बळ कोणाचे आहे, हे उघड सत्य आहे. अजित पवार यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नाही. हे सवार्र्ंनाच ठाऊक आहे किंबहुना हे खासगीत कबूल देखील करतात.

क्षीरसागरांच्या राजकारणाला जसा ब्रेक लावण्यात पवार आघाडीवर आहेत तसे त्यांनी गेवराईच्या पंडित घराण्यालाही सोडलेले नाही. कधी आपले बळ अमरसिंह पंडित यांच्यामागे तर कधी बदामराव पंडित यांच्यामागे उभे करत घरात झुंज चालूच ठेवली. ती आजतागायत सुरूच आहे. शेवटी बदामराव पंडित यांनी शिवसेना प्रवेश करत ही पवारनीती उद्ध्वस्त केली. माजलगावात प्रकाश सोळंके यांच्या विषयातदेखील पवारांनी ही खेळी नेहमीच केली आहे. राधाकृष्ण पाटील होके, तर कधी बाजीराव जगताप यांना पुढे आणत प्रकाश सोळंके यांच्या राजकारणाला नियंत्रित ठेवण्याचा प्रकार शरद पवारांनी नेहमीच केला आहे, पण मराठवाड्यातील नेतृत्वाला मोठे मानायचे नाही. कोत्या भावनेपोटी मराठवाड्यातील शक्‍तिशाली नेत्यांनी पवारांसोबत नेहमीच तडजोडीची भूमिका घेत त्रास सहन करत राहणे पसंद केले आहे.

पवारांच्या कूटनितीपेक्षा मराठवाड्यातील नेत्यांची सहनशक्‍तीच पवारांचे या विभागातील बळ असावे, असे वाटते. जेव्हा भाजपचा प्रभाव बीड जिल्ह्यात असायचा तेव्हा स्वर्गीय विमल मुंदडा मात्र एकहाती विजय केजमध्ये मिळवायच्या, पण मुंदडांना पवारांनी फार मोठे होऊ दिलेच नाही, नव्हे शेवटच्या काळात त्यांना मंत्रिपददेखील नाकारले. आज त्यांचा पुत्र अक्षय मुंदडांकडे देखील राष्ट्रवादी दुर्लक्ष करत तिथे अन्य नेत्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पवार शक्य तिथे मराठवाड्यात त्यांच्यावर विश्‍वास ठेवणार्‍या लोकांना झुलवत आले आहेत, हेच चित्र आजवर दिसले आहे.

धनंजय मुंडे यांच्याबाबतीत खासगी विधाने उघड करून अजित पवारांनी मागील पानावरून चालू असलेला खेळ पुढे चालू ठेवला आहे. ते विधान धनंजय मुंडे यांचा गौरव करण्यासठी होते की गेम करण्यासाठी, याचा विचार होणे आवश्यक आहे. अजित पवारांनी हे विधान करण्यापूर्वी काही दिवसअगोदर धनंजय मुंडे बारामतीत गेले होते आणि तिथे संकेतात असे काही घडले की, अजित पवारांनी हे विधान केले, अशी चर्चा जोरात सुरू आहे.

मराठा मतांची सहानुभूती धनंजय मुंडे यांच्या मागे उभी रहावी, यासाठी अजित पवार असे बोलल्याची चर्चा आहे. तर काही लोकांच्या मते, ज्या वाहिनीवर अजित पवार बोलले त्याच वाहिनीवरील त्याच कार्यक्रमात धनंजय मुंडे स्वतःच्या निवडीविषयी जे बोलले त्यावरूनच हे घडले असावे. कारण कोणतेही असो. धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत मराठवाड्याची अस्मिता असलेल्या मोठ्या नेत्यावर पवार कुटुंबाने पुन्हा एकदा वार केला आहे. असाच वार उस्मानाबाद बीड लातूर विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी बाबत देखील करण्यात आला.