Thu, Jul 18, 2019 10:08होमपेज › Marathwada › हिंदीच्या पेपरला सात परीक्षार्थी रस्टिकेट

हिंदीच्या पेपरला सात परीक्षार्थी रस्टिकेट

Published On: Mar 06 2018 1:39AM | Last Updated: Mar 06 2018 1:29AMबीड : प्रतिनिधी

दहावीचा सोमवारी हिंदी विषयाचा पेपर होता. या पेपरला परीक्षार्थ्यांसह पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार्‍या शिक्षकांकडे मोबाइल आढळून आले. केज तालुक्यातील विडा केंद्रावर हा  प्रकार समोर आला तर परीक्षेदरम्यान मोबाइल वापरणार्‍या चौघांसह अन्य तीन अशा सात जणांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली.

सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हिंदी विषयाचा पेपर पार पडला. माध्यमिक शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांच्या पथकाने केज तालुक्यातील विडा येथील रामेश्वर विद्यालयाच्या केंद्रास भेट दिली. त्यावेळी चार विद्यार्थ्यांकडे मोबाइल आढळून आले. या चौघांसह अन्य एका कॉपीबहाद्दरास रस्टिकेट करण्यात आले, तसेच वडवणी तालुक्यातील चिंचवण येथील मंकावती विद्यालय परीक्षा केंद्रावर 2 विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्यात आले. ही कारवाई डायटच्या प्राचार्यांनी केली. 

या केंद्रावरील तीन पर्यवेक्षकांकडेही मोबाइल आढळले. हे सातही स्मार्ट फ ोन माध्यमिक शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी जप्त केले आहेत. यासंदर्भात त्यांनी सीईओ अमोल येडगे यांना अहवाल पाठविला आहे. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा कळणार आहे.

परीक्षा कामकाजातून हटविले...

जप्त केलेल्या मोबाइलची तपासणी केली असता, मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिका आढळून आली नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी स्पष्ट केले. परीक्षा कामाकाजाची आचारसंहिता भंग केल्याबद्दल मोबाइल वापरणार्‍या तीनही शिक्षकांना परीक्षा कामकाजातून हटविण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेदरम्यान मोबाइल वापरू नयेत अशा सक्त सूचना परीक्षा मंडळाने दिलेल्या आहेत, मात्र त्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्या तीन पर्यवेक्षकांना परीक्षा कामकाजातून बाहेर केले.