Tue, May 21, 2019 22:46होमपेज › Marathwada › मराठवाड्यात पावसाअभावी गंभीर स्थिती 

मराठवाड्यात पावसाअभावी गंभीर स्थिती 

Published On: Aug 13 2018 9:13AM | Last Updated: Aug 13 2018 9:13AMपुणे: प्रतिनिधी 

मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने गंभीर स्थिती बनली आहे. जुलै महिन्यात काही दिवस दमदार पाऊस पडल्यानंतर मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसते. ऑगस्टचे पहिले दहा-बारा दिवस कोरडे गेले असून उर्वरित दीड महिन्यावरच भिस्त राहणार आहे. मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून मराठवाडा विभागात सरासरीच्या १८ टक्के कमी पाऊस पडला आहे तर विदर्भात ५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, कोकणातील स्थिती तुलनेने बरी असून आतापर्यंत तेथे अनुक्रमे १ व १२ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीच्या ३९ टक्के कमी, बीड जिल्ह्यात सरासरीच्या २५ टक्के कमी, जालना जिल्ह्यात सरासरीच्या ३७ टक्के कमी, लातूर जिल्ह्यात सरासरीच्या १४ टक्के कमी,नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या १ टक्का कमी, उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या ४ टक्के कमी, परभणी जिल्ह्यात सरासरीच्या २० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात सरासरीच्या तब्बल ३० टक्के कमी, नंदुरबार जिल्ह्यात सरासरीच्या ३६ टक्के कमी, सांगली जिल्ह्यात सरासरीच्या २८ टक्के तर सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या २५ टक्के कमी पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात मात्र समाधानकारक पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

दि. १ जून ते ११ ऑगस्टदरम्यान राज्यातील पावसाची विभागनिहाय आकडेवारी


विभाग            प्रत्यक्षातील              अपेक्षित          टक्केवारी 

                     पाऊस                    पाऊस

कोकण            २३०२.९ मि.मी    २०५०.२ मि.मी  १२ टक्के अधिक

मध्य महाराष्ट्र    ४४९.३ मि.मी      ४४६.९ मि.मी    १ टक्का अधिक

मराठवाडा       ३०७.४ मि.मी        ३७५.९ मि.मी    १८ टक्के कमी

विदर्भ             ५४३.५ मि.मी       ५७२.६ मि.मी     ५ टक्के कमी

संपूर्ण महाराष्ट्र   ६३४.४ मि.मी       ६२८.८ मि.मी      १ टक्का अधिक


आजपासून दमदार पावसाचा अंदाज

गेले काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याच्या सर्वच भागात आजपासून (सोमवार, दि. १३) दमदार पाऊस बरसण्यास सुरूवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. येत्या ४८ ते ७२ तासात कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस पडेल, असे नमूद करण्यात आले आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी तर बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला.