होमपेज › Marathwada › सेलू तालुक्यात 66 गावांतील 2700 हेक्टर क्षेत्र बाधित

सेलू तालुक्यात 66 गावांतील 2700 हेक्टर क्षेत्र बाधित

Published On: Feb 13 2018 2:41AM | Last Updated: Feb 13 2018 2:29AMसेलु ः प्रतिनिधी

सेलू शहरासह तालुक्यात 11 फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यांत झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील 66 गावांतील 2700 हेक्टर क्षेत्र बाधित होऊन शेतकर्‍यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. सहायक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तहसीलदार स्वरूप कंकाळ व प्रभारी तालुका कृषी अधिकारी आर. जी. मगर यांनी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी कुंडी, धनेगाव, म्हाळसापूर, देऊळगाव गात, डासाळा, आहेर बोरगाव, रवळगाव व राजवाडी  आदी गावांना भेट देऊन गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांचे संयुक्त पथक गारपीटग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी निश्‍चित करून संबधितांना आदेश दिले असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून मिळते.

सेलू शहरासह तालुक्यात 11 फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. सकाळीच मेघगर्जनेसह पावसालाही सुरुवात झाली होती. एवढेच नव्हे तर सकाळच्या पावसात काही भागात गारपीटदेखील झाली. मात्र रविवारी दुपारी 3:25 वाजता सेलू शहरासह तालुक्यात अनेक गावांना गारपिटीने अक्षरशः झोडपले. सतत 15 मिनिटे सुरू असलेल्या गारपिटीमुळे जागेजागी गारांचा खच साचला होता. शहरासह ग्रामीण भागातील रस्ते तसेच शेतशिवार गारामुळे पांढरे शुभ्र झाले होते.

या गारपिटीचा तालुक्यातील एकूण 95 गावांपैकी 66 गावांना फटका बसला. या 66 गावातील तब्बल 2700 हेक्टरवरील द्वारा, हरभरा, गहू यासह बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचा महसुल प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकाचे पथक अगामी काही दिवसात प्रत्यक्ष गाव शिवार व शेतावर जावुन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करतील त्यावेळी एकूण नुकसान लक्षात येईल.