होमपेज › Marathwada › राज्यात 370 वाणांनाच विक्रीची परवानगी : कृषी विद्यापीठाची कमी, मध्यम कापूस वाणांचा वापर करण्याची शिफारस 

४२ कंपन्यांच्या वाणांनाच विक्री परवानगी

Published On: Jun 01 2018 2:07AM | Last Updated: May 31 2018 11:00PMपाथरी : प्रतिनिधी

बीटी कापूस वाणांमध्ये गुलाबी बोंडअळीमध्ये प्रतिकारक्षमता तयार झाल्याने गतवर्षी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढून कापूस उत्पादन घटले. या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाने कमी व मध्यम कालावधीच्या (180 दिवस) वाणांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे यावर्षापासून राज्यात खरीप 2018 करिता 42 कंपन्यांच्या 370 वाणांनाच विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात कापूस पिकाखालील क्षेत्र 41 लाख हेक्टर आहे. देशात सर्वाधिक हे क्षेत्र व उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होते. बहुतांश क्षेत्र हे विदर्भ-मराठवाडा व खान्देश भौगोलिक पट्ट्यात आहे. 2006 पासून जनुकीय परावर्तीत तंत्रज्ञानावर आधारित बियाणांचा म्हणजेच बोंडअळीस प्रतिकारक अशा बीटी बियाणांचा वापर होतो. या वाणाखालील कापूस क्षेत्र राज्यात एकूण क्षेत्राच्या 98 टक्के आहे. या वाणांना केंद्रीय पर्यावरण विभागांतर्गत जी.ई.अ सी.या समितीमार्फत मान्यता दिली जाते. अशा परवानगी प्राप्त व महाराष्ट्राकरिता शिफारस असलेल्या कापूस वाणांनाच राज्यात विक्रीस परवानगी देण्यात येते. 

गतवर्षापर्यंत अशा मान्यताप्राप्त वाणांची मूळ उत्पादक कंपनीबरोबर विपणन कराराद्वारे को-मार्केटिंग करणार्‍या इतर कंपन्यादेखील विक्री करत होत्या.अशा मार्केटिंग कराराद्वारे विक्री करताना जी.ई.ए.सी.यांनी मंजूर केलेल्या नावा व्यतिरिक्त इतर वेगवेगळी ब्रॅन्डेडनेम टाकून एकच वाण अनेक ब्रॅडने विक्री करण्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. अशाप्रकारे मुळ कंपनीच्या 402 वाणांची गतवर्षी एकूण 624 वेगवेगळ्या नावाने विक्री करण्यात आली. 

यामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रामवस्था निर्माण होऊन प्रसंगी फसवणूक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 2018 च्या खरीप हंगामापासून जी.ई.ए.सी.ने मंजूर केलेल्या नावानेच विक्री करण्याचे धोरण शासनाने निश्चित केलेे. याबाबत शेतकर्‍यांसाठी तालुका स्तरावर कृषी अधिकारी व पंचायत समिती कार्यालय येथे माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एकाच बॅँडनेमद्वारे होणार वाणाची विक्री ः मूळ उत्पादक कंपनीने कापूस बियाणांचे पॅकिंग करताना जी.ई.ए.सी.मान्यता प्राप्त नाव ठळकपणे दिसण्याचे बंधनकारक केले आहे. एका वाणाकरिता एकच ब्रॅँडनेम निश्चित करावा लागेल. मूळ उत्पादकांच्या मंजूर वाणांची को-मार्केेटिंगद्वारे इतर कंपनीस विक्री करावयाची असल्यास त्यांनी उत्पादनाच्या पॅकिंग व लेबलप्रमाणे विक्री करण्याचे निर्देश दिले. यामुळे राज्यात एका वाणाची एकाच ब्रॅण्डनेमद्वारे विक्री होणार आहे. 

शेतकर्‍यांना चांगल्या प्रतीचे बियाणे मिळावे यासाठी शासनाने ब्रॅन्डेड कंपन्यांना व ठराविक वाणांनाच परवानगी दिली आहे. त्या कंपन्यांच्या वाणांची खरेदी करावी, असे अवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी चांगल्या प्रतीचे बियाणे खरेदी केल्यास बोंडअळीसारख्या किडींचा प्रादुर्भाव होणार नाही व नुकसान टळेल.  - एच.व्ही. खेडकर, तालुका कृषी अधिकारी, पाथरी.