Fri, Apr 26, 2019 03:21होमपेज › Marathwada › मराठवाड्यातील ५ गोशाळांची अनुदानासाठी निवड

मराठवाड्यातील ५ गोशाळांची अनुदानासाठी निवड

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परभणी : प्रतिनिधी

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या नवीन राज्यस्तरीय योजनेंतर्गत राज्यात 21 गोशाळांची अनुदानासाठी निवड झाली. यात मराठवाड्यातील 5 संस्थांचा समावेश असून, परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी गोशाळेचा समावेश आहे. सदरील संस्थांना प्रत्येकी 25 लाखांचे अनुदान वितरणास मंजुरीचा निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी राज्यपालांच्या आदेशान्वये 31 मार्च रोजी निर्गमित केला आहे. 

मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित 34 जिल्ह्यांमध्ये भाकड गाई व गोवंशीय संगोपनासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका संस्थेस अनुदानापोटी 1 कोटी रुपयांचे वाटपाची योजना सुरू केली. यात अनुदानास पात्र संस्थांची निवडीसाठी राज्यस्तरीय निवड समितीची 19 मार्च रोजी बैठक झाली. बैठकीत प्राप्‍त प्रस्तावांची तपासणी करून चर्चा झाली.समितीने परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव येथील छत्रपती शिवाजी गोशाळेची निवड केली आहे. संस्थेस सन 2017-18 आर्थिक वर्षाकरिता एकवेळचे 1 कोटीचे अनुदान हे चार टप्प्यात मंजूर केले जाणार आहे. 

पहिला टप्पा म्हणून 25 लाखांची मंजुरी दिली. हे अनुदान पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्‍त यांच्यामार्फत संस्थेच्या बँक खात्यात डीबीटीनुसार जमा होणार आहे.  राज्यातील 21 लाभार्थी संस्थाची निवड केली असून अनुदानापोटी 5 कोटी 25 लाखांची तरतूद केली. ज्या संस्थांना अनुदान मंजूर झाले त्या संस्थांनी खर्चाच्या अंदाजपत्रकासह सदरील प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत असे कळविले.

पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने उपक्रम राबवणे संस्थेस बंधनकारक ः देशी गायीच्या जातीचे संवर्धन व संख्येत वाढ करावी, देशी तसेच गावठी गायींत शुध्द देशी गायींच्या जातीच्या वळूचे वीर्य वापरून कृत्रीम रेतन करावे. यातील पैदास नर वासरे पशुधन विकास मंडळाच्या मागणीनुसार गोठीत रेतन प्रयोगशाळेसाठी नाममात्र दराने उपलब्ध करावे. तसेच नर वासरे व कालवडी शेतकर्‍यांना विक्री करावे, पशुधनात आंतरपैदास झाल्यास निर्माण होणार्‍या नर वासरे व कालवडी यांची वाढ खुंटणे. कालवडी उशिरा माजावर येणे, वेळीच गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे हे टाळण्यासाठी संस्थेतील वळूंचे खच्चीकरण करावे, पशुधनास टॅगिंग करावे अशा अनेक उपाययोजना व उपक्रम पशुसंवर्धन विभागाच्या सल्ल्याने राबवणे संस्थेस बंधनकारक केले आहे.

असा राहणार खर्चाच्या अंदाजपत्रकाचा तपशील ः पशुधनासाठी नवीन शेडचे बांधकाम, आवश्यकतेनुसार विद्युतीकरण इत्यादी कामांच्या खर्चाचे अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून प्रमाणित करावे.नवीन विहीर व विंधन विहिरीकरिता विद्युत पुरवठ्यासाठी साधनसामग्रीचा खर्च प्रस्तावित केल्यास, विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून प्रमाणित करावे. संस्थेचा प्रस्ताव प्राप्‍त होताच या कार्यालयांनी प्रस्ताव तपासणी करत तत्काळ मान्यता दिल्यानंतर आता  प्रशासकीय विभागाची मान्यता मिळणार आहे. यानंतरच संस्थेस मंजूर अनुदानातून प्रत्यक्ष खर्च करण्याची मुभा आहे.

 

Tags : Parbhani, Parbhani news, Marathwada, Goshala, grant,


  •