Sat, Feb 16, 2019 05:06होमपेज › Marathwada › भेसळीच्या संशयावरून बियाणे नमुने प्रयोगशाळेत

भेसळीच्या संशयावरून बियाणे नमुने प्रयोगशाळेत

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 11:46PMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्हाभरात अनेक कृषी परवानाधारक विक्रेत्यांकडून भेसळयुक्त बियाणे विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. कृषी विभागाने मागील पंधरा दिवसांत 105 बियाण्यांचे नमुने परभणी येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर संबंधित कृषी केंद्रचालकावर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मागील काही वर्षांपासून सोयाबीन, कपाशी व इतर पिकांच्या वाणांमध्ये भेसळ बियाणे येत असून, त्यामुळे शेतकर्‍यांना फटका बसत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी अडचणीत असताना कृषी केंद्रचालकांकडून वाढीव नफ्याच्या हवास्यापोटी भेसळयुक्त बियाणे विक्री केल्या जात असल्याचा प्रकार सर्रासपणे सुरू होता. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यावर्षी सुरुवातीपासूनच नियोजन केले होत.

कृषी केंद्राची तपासणीकरीत संशयास्पद बियाण्यांचे नमुने परभणी येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास 105 बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तो अहवाल आठ दिवसांत कृषी विभागाला प्राप्त होणार आहे. अहवालात भेसळयुक्त बियाण्यांचा संदर्भ आल्यास संबंधित केंद्रचालकावर कारवाई करण्याचे नियोजन कृषी विभागाने सुरू केले आहे. भेसळयुक्त बियाण्यांसह इतर बाबींवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय असे एकूण सहा पथके तयार केली आहेत. या पथकामार्फत बियाण्यांची तपासणी करून संशयास्पद बियाणे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. पेरणी जवळपास आटपत आली असल्याने पुढील महिन्यात खताची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये काही संशयास्पद आढळल्यास तेही नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याचे पथकामार्फत सांगण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांचा अनुभव बघता, बाजारात भेसळयुक्त बियाणे विक्री होत असल्याने यावर कृषी विभागाने नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.