Fri, Apr 19, 2019 12:23होमपेज › Marathwada › रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

Published On: Apr 08 2018 2:02AM | Last Updated: Apr 08 2018 2:02AMपूर्णा : मुजीब खुरेशी

मराठवाड्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन असलेल्या पूर्णा रेल्वेस्थानकाची व प्रवाशी वर्गाची सुरक्षा व्यवस्था संपूर्णपणे धोक्यात आल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे. 6 एप्रिलला रात्री 9.30 वाजता नांदेड-दौंड स्थानकावर थांबलेली असताना किरकोळ कारणावरून प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. 

स्थानकावरील चार प्लॅटफार्म व असंख्य प्रवासी रेल्वे गाड्यांच्या सुरक्षेची जवाबदारी लोहमार्ग पोलिस चौकीत तैनात केवळ सहा कर्मचार्‍यांवर अवलंबून आहे.  यातील तीन ते चार कर्मचारी अन्य कामावर तर काही रजेवरही असतात. त्यामुळे चौकीत केवळ एक किंवा दोन कर्मचारी सेवेवर कार्यरत असतात. अशा वेळी स्थानकावर काही अप्रिय घटना घडल्यास एका कर्मचार्‍याला चौकी सांभाळावी लागते तर एका कर्मचार्‍याला प्रवासी सुरक्षेची जबाबदारी सांभाळावी लागते. अशीच एक भयंकर घटना 6 एप्रिल रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या दरम्यान नांदेड-दौंड प्रवासी रेल्वे पूर्णा स्थानकावर आली असता घडली.

यावेळी प्रवाशांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे तुफान हाणामारीत रूपांतर झाले. यावेळी चौकीत केवळ एकच कर्मचारी असल्याने प्लॅटफार्म क्र. 4 वरील हाणामारीचा प्रकार गाडी निघेपर्यंत चालतच राहिला. यावेळी प्रवाशांना सुरक्षा पुरवण्यात रेल्वे प्रशासन संपूर्णपणे हतबल ठरले, असेे प्रकार सातत्याने पूर्णा स्थानकावर घडत असताना द. म. रे नांदेड विभाग  व लोहमार्ग पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने दखल घेऊन कर्मचारी संख्या वाढवत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नांदेड-पूर्णा-परभणी रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना मारहाणीचे प्रकार, लुटमारीचे प्रकार तसेच अल्पवयीन मुला-मुलींना फूस लावून पळवण्याचे प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 

Tags : Marathwada, Security, threat, railway, passengers