आष्टी ः सचिन रानडे
कुठल्याही शासकीय योजनेतून अद्याप कसलीच मदत नसतानाही आजपर्यंत 3 लक्ष 50 हजार पर्यंतची लोकसहभागातून जमा झालेल्या रकमेतून प्रोजेक्टर, टॅब्लेटस, अँड्रॉइड टीव्ही, वायफाय यंत्रणा, साउंड सिस्टिम, इन्व्हर्टर, वॉटर फिल्टर सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, परंतु रिक्त जागांवर शिक्षकांची नियुक्ती आणि शाळेच्या इमारतीसाठीचा निधी मात्र शिक्षण विभागाकडून मिळालेला नाही.
आष्टी तालुक्यातील चिंचाळा गावच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 1-7 पर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेत 91 विद्यार्थी आहेत. माञ या शाळेच्या खोल्यांची दुरवस्था झाली आहे. कमी उंचीच्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये अध्यापन करण्याऐवजी शाळेजवळच्या झाडाखाली बसून शिकविण्याची वेळ या शाळेतील शिक्षकांवर येत आहे. विशेष म्हणजे 7 वी पर्यंत असणार्या या शाळेला एकूण 4 खोल्या त्यात 3 नादुरुस्त असल्याने गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाचा आसरा देखील या शिक्षकांना घ्यावा लागतो हे विशेष. दोन आमदार आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद असलेल्या मतदारसंघातील या शाळेला लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन एक सुसज्ज इमारत उभी करावी अशी अपेक्षा चिंचाळा ग्रामस्थांना आहे, मात्र याची दखल जर घेतली गेली नाही तर अखेर हे ग्रामस्थ लोकशाही मार्गाने उपोषण करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.
गावातील एकही विद्यार्थी बाहेरगावी शिकण्यासाठी जात नाही. महिलांनीच पाल्ये इथेच शिकतील असा आग्रह धरल्याने गावातील विद्यार्थी गावातच शिकतात. विशेष म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक असलेले रत्नाकर चव्हाण यांच्या पाल्यानेही याच शाळेत शिक्षण घेत पाचवीला शिष्यवृत्ती मिळवली.
शाळेला 20 गुंठे जागा असूनही निधीअभावी शाळेची सुसज्ज इमारत उभी राहू शकत नाही. यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. गावकर्यांनी पुढाकार घेऊन विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता लोकप्रतिनिधींनी इमारतीसाठी निधी देण्याची मागणी होत आहे.
चिंचाळा सारख्या ग्रामीण भागात शिक्षकांच्या पुढाकाराने संगणकीय शिक्षण मुले घेत आहेत. शहरातील महागड्या फीस असणार्या खासगी शाळांना गावातील मुले भारी पडतील असे चित्र आहे. त्या शाळेसाठी नवीन इमारत मंजूर व्हावी यासाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहोत. अद्याप आमची दखल कोणीच घेतली नाही. यामुळे आमच्या समोर उपोषणाशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.
: अशोक पोकळे, उपसरपंच, चिंचाळा.