Mon, Jun 17, 2019 03:18होमपेज › Marathwada › कामगार पाल्यांना आठ लाख रुपयांची शिष्यवृत्ती 

कामगार पाल्यांना आठ लाख रुपयांची शिष्यवृत्ती 

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 25 2018 9:36PMपरळी : प्रतिनिधी

कामगार कल्याण केंद्राच्या वतीने शहरातील 315 कामगारांच्या पाल्यांना सात लाख 80 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. सन 2017-18 करीता ही शिष्यवृत्ती देण्यात आली. कामगारांच्या मुलामुलींना ते शिकत असलेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाकरिता अधिक मदत मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. विशेष गुण संपादित केलेल्या कामगारांच्या गुणवंत पाल्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात दहावी पासून पदवी व पदव्युत्तर तसेच पॉलिटेक्नीक, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या  विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. 2000 ते 5000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते.यात वैद्यनाथ शुगर, परळी एस. टी. आगार , गजानन एक्स्ट्रॅक्शन ऑईल मिल, महावितरण, महापारेषण, सहकारी बँका, पन्नगेश्वर शुगर, गंगाखेड शुगर, जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रांत काम करणार्‍या कामगारांच्या मुलांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेंतर्गत 43 विद्यार्थ्यांना 72 हजार रुपये मंजूर करण्यात आले. तसेच क्रीडा शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, गंभीर आजार अनुदान योजना राबविली जाते. याचा लाभही कामगारांनी घ्यावा, असे आवाहन केंद्र संचालक आरेफ शेख यांनी केले आहे.

रक्‍कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा

दहावीच्या 60 विद्यार्थ्यांना एक लाख 20 हजार रुपये, अकरावीच्या 84 विद्यार्थ्यांना एक लाख 68 हजार, बारावीच्या 46 विद्यार्थ्यांना 92 हजार, पदवीच्या ( बी. ए., बी. एस्सी., बी. कॉम.) 50 विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार, पदव्युत्तरच्या 10 विद्यार्थ्यांना 30 हजार तर पॉलिटेक्नीकच्या 32 विद्यार्थ्यांना 80 हजार, अभियांत्रिकीच्या 29 विद्यार्थ्यांना एक  लाख 45 हजार तर वैद्यकीयच्या तीन विद्यार्थ्यांना 15 हजार आणि एमपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणार्‍या एका पाल्यास 5 हजार असे एकूण 315 विद्यार्थ्यांना सात लाख 80 हजार रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. कामगार पाल्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.