Tue, Jul 23, 2019 02:31होमपेज › Marathwada › शिष्यवृत्ती योजनेचा खेळखंडोबा

शिष्यवृत्ती योजनेचा खेळखंडोबा

Published On: Mar 13 2018 1:42AM | Last Updated: Mar 13 2018 1:42AMपरभणी : प्रदीप कांबळे

शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत मॅट्रेकोत्तर शिष्यवृती देण्यात येते.  मात्र यावर्षी महाविद्यालकडून कार्यवाहीस्तव उदासीनतेमुळे या योजनेचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.  वर्ष लोटले तरी अद्याप हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे गेलेच नसल्याने शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. महाविद्यालयांना सक्‍त आदेश असतानाही यावर्षी मात्र त्यांनी उदासीनता दाखविला आहे. 

अपहारांना आळा बसविण्यासाठी शासनाने शिष्यवृत्तीसह अन्य शैक्षणिक रक्‍कमही थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी महाडीबीटी प्रणाली 3 ऑगस्ट 2017 रोजी प्रारंभ केली.   मात्र महाडीबीटी प्रणालीत शिष्यवृत्ती अर्ज नूतनीकरण आणि नवीन नोंदणी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामुळे शासनाने महाडीबीटी पोर्टल बंद करून  नूतनीकरणासाठी जुने महा ई स्कॉरशीप पोर्टल सुरू केले. नवीन विद्यार्थी नोंदणीसाठी ऑफलाइन पध्दतीने अर्ज स्वीकारण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले. तालुकानिहाय बैठका व कॅम्प घेऊन समाजकल्याण विभागाने महाविद्यालयातील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले. मात्र वर्ष शेवटीला आले तरी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या योजनेचे गांभीर्य बाळगले नाही. 12 मार्चपर्यंत अंदाजे 24 हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ 8 हजार 859 अर्जच कार्यवाही व मंजुरीस्तव समाजकल्याण विभागात आले आहेत. यातही  3 हजार 994 अर्जांमध्ये अनंत स्वरूपाच्या त्रुटी असल्याने हे अर्ज त्रुटीत आले आहेत.  

विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जच भरणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सद्यस्थितीला परीक्षा सुरू असून त्या संपल्यानंतर  घरी जाणार्‍या विद्यार्थ्यांना मात्र शिष्यवृत्तीच्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा महाविद्यालयाचे खेटे मारावे लागणार आहेत. महाविद्यालय प्रशासनाने या संदर्भात यापूर्वीच जर गांभीर्यपूर्वक विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांची छाननी करून ते समाजकल्याण विभागाकडे पाठविले असते तर आतापर्यंत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली असती,  परंतु महाविद्यालयांनी या शिष्यवृत्तींच्या कार्यवाहीची गती मंदावली असल्याने लाभ मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

शासनाकडून येणारा निधी वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असलेल्या समाजकल्याण विभागाकडून वेळोवेळी पाठपुरावा करूनही जिल्ह्यातील महाविद्यालयांनी उदासीनता दाखविल्याने हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेत मिळू शकला नाही.  महाविद्यालयांनी त्वरित पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवून शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा करावा अन्यथा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार हे निश्चित आहे. विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाने कार्यवाही करणे अनिवार्य असून त्यांचा अर्ज स्वीकारून तो योग्य असल्याची खात्रीदेखील महाविद्यालयांनी करून घेणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात या कार्यवाहीला कासव गती प्राप्‍त झाली असल्याने यावर्षी शिष्यवृत्तीचा एकही हप्‍ता न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.