होमपेज › Marathwada › सौंदाना गावाला २५ वर्षांपासून रस्ताच नाही

सौंदाना गावाला २५ वर्षांपासून रस्ताच नाही

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 10:56PMपाटोदा : महेश बेदरे 

देशाला स्वातंत्र्य मिळून आता तब्बल 70 वर्ष उलटून गेली आहेत. या पार्श्‍वभूमीवर  अजूनही ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचलेलीच नाही. सरकार कितीही बदलले तरी ग्रामीण भाग अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. पाटोदा तालुक्यातील सोैंदाना या गावात अद्यापपर्यंत मूलभूत सुविधाच पोहोचल्या नाहीत. या गावात जाण्यासाठी तब्बल 20 ते 25 वर्षापूूर्वी बनवलेल्या साध्या रस्त्याचे आता अवशेष ही राहिले नाहीत. संपूर्ण रसत्यावर केवळ माती आणि दगडच दिसत आहे.

सौंदाना हे सहाशे ते साडेसहाशे लोकसंख्येचे गाव. या गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे समोर आले आहे. येथील ग्रामस्थांच्या मते 20 ते 25 वर्षांपूर्वी या ठिकाणी एक साधा रस्ता होता, मात्र त्यानंतर आतापर्यंत एकदाही या रस्त्याची डागडुजी झाली नाही. तसेच आतापर्यंत एकाही योजनेच्या माध्यमातून या रस्त्याचे काम झाले नाही. प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या या उदासिनतेचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. रस्ताच नसल्यामुळे या गावात आत्तापर्यंत एस. टी. बस ही पोहोचलेली नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संपवून पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जाणार्‍या विद्यार्थ्यांचेही पायपीटीने प्रचंड हाल होतात. पावसाळ्यात तर या रस्त्याने पायी चालणे ही कठीण आहे. पावसाळ्यात दुचाकी फाट्यावरच लावून दोन किमी पायी चालत जावे लागते. गेल्या वीस वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजीही झाली नाही. रात्री - अपरात्री या ठिकाणी एखाद्या आजारी रुग्णला दवाखान्यात न्यायचे असल्यास प्रचंड हाल होतात. यामुळे गावकर्‍यांना प्रचंड त्रास होत आहे.

Tags : Saundana village, No road, for 25 years,