होमपेज › Marathwada › सरपंचांना ओळखपत्राची प्रतीक्षा

सरपंचांना ओळखपत्राची प्रतीक्षा

Published On: Mar 18 2018 1:54AM | Last Updated: Mar 18 2018 1:54AMपरभणी :  नरहरी चौधरी

राज्यातील दिवाळीपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पहिल्यांदाच सरपंचासाठी थेट निवडणूक झाली. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. एकंदरीत जनतेतून निवडलेल्या सरपंचाला विकासकामे करण्यासाठी त्रास होणार नाही हा त्यामागचा हेतू होता. ज्याप्रमाणे खासदार, आमदार व जिल्हा परिषद सदस्यांना ओळखपत्र देण्यात येतात. त्याचप्रमाणे सरपंचांनाही त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी ओळखपत्र देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. या अनुषंंगाने जिल्हयातील एकूण 704 सरपंचांपैकी केवळ 246 जणांना याचे वाटप झाले असून अजून 458 सरपंच ओळखपत्राच्या प्रतीक्षेत आहेत.

पहिल्यांदाच सरपंचपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांना गावाच्या विकासाबद्दल आणि शासनाच्या विविध योजनांविषयी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे यांनी दिलेली आहे. सरपंच हा ग्रामविकासाचा केंद्रबिंदू आहे. गावात उत्पन्‍न वाढविण्यासाठी बीओटी तत्वावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजनेंतर्गत गावात ग्रामसचिवालये बांधता येणार आहेत. 

ज्यामध्ये गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्या कार्यालयासह इतर कार्यालये एकत्र राहणार आहेत. विविध विकासकामे करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून सरपंचांनी याचा गांभिर्याने विचार केल्यास त्यांचे चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे. रोहयोंतर्गतही कामे होऊ शकतात. फक्‍त नियोजन महत्वाचे असते. 
एकंदरीत हे सर्व करताना सरपंचांचा उत्साह टिकून रहावा व त्यांना शासकीय कार्यालयात जाताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही हा या ओळखपत्र देण्यामागचा शासनाचा उदात्त हेतू आहे.  

URL : Sarpanchs, waiting, identity card, Parbhani news