Tue, Jul 16, 2019 13:23होमपेज › Marathwada › वाळू माफियांकडून तलाठ्यास मारहाण, ठार मारण्याची धमकी

वाळू माफियांकडून तलाठ्यास मारहाण, ठार मारण्याची धमकी

Published On: Jun 29 2018 10:01PM | Last Updated: Jun 29 2018 10:01PMगेवराई : प्रतिनिधी

अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर का पकडले म्हणून वाळू माफियांनी जातेगाव येथील तलाठी सज्जाचे तलाठी यांना मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी जातेगाव नजीक सेलू तांडा ते गेवराई रोडवर घडली. याप्रकरणी दोन संशयितांविरोधात तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान तालुक्यात वाळू माफियांकडून महसूल अधिकारी यांना वारंवार होणारी मारहाण व जिवे मारण्याची धमकी यामुळे अधिकारी यांना कामे करणे जिकीरीचे बनले आहे.

गेवराई तालुक्यातील जातेगाव तलाठी सज्जाचे तलाठी विठ्ठल वसंतराव आमलेकर असे मारहाण झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. आमलेकर हे जातेगाव तलाठी सज्जा हद्दीत दैनंदिन कामे करत असताना सेलू तांडा ते गेवराई रोडवर दोन विना नंबरचे दोन ट्रक्टर अवैध वाळू घेऊन जाताना त्यांनी पकडले. यानंतर ट्रक्टर चालक अशोक जगताप याने मालकाला याची माहिती देताच मालक बंडू घाटूळ हे (एमएच २३ एए ११) या क्रमांकाच्या बुलेटवरुन घटनास्थळी दाखल झाला. यानंतर घाटूळ यांनी तलाठी आमलेकर यांना तू ट्रॅक्टर का पकडलेस म्हणून धक्काबुक्की करत मारहाण केली तसेच ट्रॅक्टरच्या चाकाखाली घालून मारण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र प्रसंगावधान राहिल्याने माझा जीव वाचला असुन जिवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादित तलाठी आमलेकर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी तलाठी आमलेकर यांच्या फिर्यादीवरून बंडू घाटूळ व अशोक जगताप यांच्याविरोधात तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

क्लिप व्हायरल

अवैध वाळू घेऊन चाललेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर आरोपी बंडू घाटूळ यांनी तलाठी आमलेकर यांना केलेली मारहाण तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ही सर्व क्लिप तेथे उपस्थित एकाने मोबाईलमध्ये कैद केली असुन ती सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.