Tue, Mar 26, 2019 11:50होमपेज › Marathwada › रात्री साठा, दिवसा पुरवठा

रात्री साठा, दिवसा पुरवठा

Published On: Feb 10 2018 1:34AM | Last Updated: Feb 09 2018 11:37PMबीड : प्रतिनिधी

वाळू उत्खननावर आलेली बंधने, जिल्ह्यातील वाळूघाटांचे रखडलेले लिलाव याचा परिणाम वाळू दरासह बांधकामे, मजुरांवरही झाला आहे. वाळू उत्खननास मनाई असल्याने रात्रीच्या वेळी वाळू आणून ती बीड शहरात साठविली जात आहे. दिवसा छोट्या वाहनाने ही वाळू विक्री केली जात आहे.  

गेल्या आठ ते दहा वषार्र्ंत वाळू हा विषय संवेदनशील व आर्थिक कमाईचा झाला आहे. वाळू विक्रीतून काहींनी बख्खळ कमाई केली आहे, तर दुसरीकडे शासनानेही वाळू उत्खनन, विक्रीवर बंधने आणली आहे. जेवढे बंधने तेवढा भाव अधिक असे गणित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वाळूचे लिलाव नियमांच्या कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे वाळू उपसा बंद आहे, तर दुसरीकडे यंदा सुगी चांगली झाल्याने बांधकामे वाढू लागली आहेत. अशा परिस्थितीत वाळू टंचाई झाल्याने वाळूचे दर पाच हजार रुपये ब्रासपेक्षा अधिक झाले आहेत. 

बीड शहरातील संत नामदेवनगर, पांगरी रोड, अंबिका चौक, शिंदेनगर परिसर, बार्शी नाका परिसर, शिवाजीनगर, मोंढा परिसर या भागांत सध्या 700 ते 800 मोठमोठ्या इमारती, रोहाऊस यांचे बांधकामे सुरू आहेत. यासह शहरात छोटी-मोठी बांधकामेही सुरू आहेत. या सर्वांना दररोज हजारो ब्रास वाळू लागते.  काही वाळू विक्रेते बीड शहरातील खासबाग, चर्‍हाटा रोड, मोंढा भाग, जालना रोड, बार्शी रोड या भागांत रात्रीच्या वेळी वाळू आणून ती साठवून ठेवतात. वाळू उपसा, वाहतूक यांना बंदी असल्याने वाळू वाहतूक व उपसा रात्रीच्या वेळी केला जातो. या भागात मोठमोठे वाळू साठे आहेत. रात्री आणलेली वाळू दिवसा छोटा रिक्षा, टेम्पो, ट्रॅक्टर यामधून बांधकाम करणार्‍या मालकांना विक्री केली जाते. दर दुसरीकडे वाळूचे दर वाढल्याने शहरातील अनेकांनी इमारतीचे प्लास्टर व बांधकाम बंद ठेवले आहे. याचा परिणाम बांधकाम क्षेत्रातील मिस्त्री, मजूर यांच्यावरही होत आहे. 

मायनिंग प्लॅन तयार करणे सुरू

जिल्ह्यातील गोदावरी, सिंदफणा, मांजरा या नद्यांतील वाळूघाटांचा लिलाव करण्यात येत होता, मात्र याचदरम्यान न्यायालयाने स्टे आणला आहे. आता, जिल्ह्यातील गौण खनीज उत्खननासाठी मायनिंग प्लॅन तयार करण्यात येत आहे. हा प्लॅन तयार केल्यानंतर पुन्हा लिलाव करण्यात येणार आहेत. 

- आनंद पाटील,जिल्हा गौण खनीज अधिकारी, बीड.