होमपेज › Marathwada › समाधान शिबीर  सरकारचे की भाजपचे?

समाधान शिबीर  सरकारचे की भाजपचे?

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 10 2018 9:48PMपरभणी ः प्रतिनिधी

शासनाच्या वतीने गोरगरिबांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून शासन आपल्या दारी  येऊन लाभ देण्यात येणार आहे, पण यासाठीच्या बैठकांचे कार्यक्रम पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर प्रत्येक ठिकाणी हायजॅक केल्याचे वास्तव पहायला मिळत आहे. 

यातून योजनेपेक्षा पक्षाची ताकद जिल्ह्यात कशी वाढेल याचा प्रयत्न ते करताना दिसत असून या कार्यक्रमाला सर्व शासकीय यंत्रणा वापरली जात आहे. मात्र पाणीपुरवठा मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे शासकीय यंत्रणा वैतागली असून हा कार्यक्रम शासकीय आहे का भारतीय जनता पार्टीचा असा प्रश्‍न कर्मचार्‍यांमध्ये दबक्या आवाजात सुरू झाला आहे. 

परभणी जिल्ह्यात 7 ते 9 व 12  फेबु्रवारी या चार दिवसांत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  यात आतापर्यंत गंगाखेड व सोनपेठ तालुका वगळता सर्वच तालुक्यांत समाधान योजनेचा कार्यक्रम लोणीकरांनी हायजॅक केला. यासाठी लोणीकरांनी  सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावली आहे पण या शिबिरातून सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याऐवजी भाजपची व स्वतःच्या विभाग खात्याची माहिती लोणकरांकडून नागरिकांसमोर केली जात आहे. हे शिबीर शासनस्तरावर करण्यात यावेत, असा नियम असतानाही राजकीय स्वरूप देऊन लोणीकरांनी हे कार्यक्रम शासन दरबारी बंधनकारक केले आहेत. मात्र या शिबिराला शासकीय कर्मचारी व भाजपचे पदाधिकारीच हजर दिसत आहेत. त्यामुळे शासनाची योजना आपल्या दारी ही यशस्वी कितपत होईल हे सांगणे अवघड झाले आहे. परभणी व जालना जिल्ह्यांतील 2 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे सरकारचे नियोजन आहे. यात सरकारने आतापर्यंत कोणकोणत्या योजना राबविल्या आहेत. हा पाढा वाचण्याऐवजी भाजप व आपण किती काम करत आहोत. याचाच प्रचार धूमधडाक्यात सुरू केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे हा कार्यक्रम शासनाचा की भाजपचा असा प्रश्‍न आहे. 

शासकीय लाभाचे लोणीकरांच्या हस्ते वाटप 
पूर्णा येथे आयोजित शिबिराच्या कार्यक्रमात शासकीय लाभांचे वाटप स्वतः लोणीकरांच्या हस्ते लाभधारकांना करण्यात आले. यावेळी हे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करणे अपेक्षित होते. कारण जिल्हापातळीवरील लाभधारकांना त्यांनीच वाटप करण्याचे शासनाचे धोरण आहे, पण हाही कार्यक्रम त्यांनी हायजॅक केल्याचे दिसते.

गडकरी व फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार शिबीर 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून परभणी व जालना जिल्ह्यात समाधान शिबीर घेण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक महत्त्वाकांशी योजना आहेत. त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे.