Thu, Jun 20, 2019 14:40होमपेज › Marathwada › समदभाईंची वयाच्या 65 व्या वर्षीही समाजसेवेची धडपड सुरूच

३३ वर्षांपासून सुविचार देवाण-घेवाण  

Published On: Jun 01 2018 2:07AM | Last Updated: May 31 2018 11:14PMपाटोदा : प्रतिनिधी

वय वर्ष 65, तरीही तरुणांना लाजवेल असा उत्साह व समाजसेवेची अविरत धडपड! पाटोदा शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व दलित मित्र शेख अब्दुल समद नबी म्हणजेच समद भाई यांचे  गेल्या तब्बल 33 वर्षांपासून अविरत समाजकार्य सुरू असून ते दररोज न चुकता शहरात विविध ठिकाणी फलक लिहून सुविचारांची देवाण घेवाण व जनजागृती करत असून त्यांचे हे कार्य अद्यापही न थांबता सुरू आहे.

सकाळ झाली की हाती खडू व फलक पुसण्यासाठी कपडा घेऊन समद भाई आपल्या रोजच्या कामासाठी घराबाहेर पडतात. पाटोदा तहसील कार्यालय समोर, आंबेडकर चौक, तसेच सोसायटी समोर अशा तीन ते चार ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी फलक लिहितात, या माध्यमा तून ते दररोज नवा सुविचार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन तसेच शासनाच्या विविध योजनाचीही माहिती या फलकावर लिहितात. मागील 33 वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम नित्यनियमाने सुरू आहे.

दलित मित्र पुरस्काराने सन्मान 

समदभाई यांच्या समाजसेवेची दाखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांचा 2006-2007 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार देऊन गौरव केला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांचा मुंबई येथे सन्मान करण्यात आला होता

सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनाची माहिती व्हावी व त्या सोबतच जनजागृती होऊन चांगल्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. शरीर साथ जोपर्यंत देते आहे, तोपर्यंत हे कार्य सुरूच राहील.- समदभाई