Thu, Jun 27, 2019 17:45होमपेज › Marathwada › तुरडाळीत पणनला एक, दुकानदाराला 4 रुपये

तुरडाळीत पणनला एक, दुकानदाराला 4 रुपये

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:25AMपरभणी : नरहरी चौधरी

रास्तभाव दुकानातून शिधापत्रिकाधारकांना केवळ 35 रुपये दराने प्रतिकिलो तूरडाळ देण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक व तामिळनाडू राज्यातील वितरण व्यवस्था लक्षात घेत घेण्यात आला आहे. यात स्वस्त धान्य दुकानात शिधा वाटपधारकांना 30 रुपये प्रतिकिलो ग्रॅम पॅकिंग, 5 रुपये या पॅकिंगवर मार्जीन देऊन कॅश अ‍ॅन्ड कॅरी या तत्त्वावर 35 रुपये प्रतिकिलो या दराने ती विक्री करता येणार आहे. या 5 रुपयांच्या नफ्यांत 1 रुपया पणन महासंघाचे कमिशन राहणार असून 4 रुपये दुकानदारास मिळणार आहेत. 

राज्य शासनाच्या वतीने बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी केलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर तुरडाळीची विक्री स्वस्त धान्य दुकानातून करण्याचा निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने 28 नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आला. यानुसार दुकानदारांना तुरडाळीची विक्री करण्याबाबतच्या सूचना 30 नोव्हेंबर 2017 रोजी दिल्या. ही विक्री मोठया प्रमाणात व्हावी या हेतूने दुकानदारास 3 रुपये मार्जीन देण्याच्या निर्णयातही फेरबदल झाला. जिल्ह्यातील कार्डधारकांना धान्य वितरणासाठी पावणेबाराशे रेशन दुकानदारांना इ-पॉस मशीन दिल्या असून याद्वारे वितरण सध्या सुरू आहे.

याकरिता आधार व्हेरिफिकेशनही केले. यामुळे कामात पारदर्शकता येत असल्याने परभणी जिल्हा व्हेरिफिकेशनमध्ये राज्यात तिसरा आला. जिल्ह्यात 2 लाख 33 हजार 335 कुटुंब कार्डधारक आहेत. यापैकी 2 लाख 10 हजार 179 कुटुंबाचे आधार लिंकिंग झाले. यात अंत्योदय 44 हजार 881 पैकी 38 हजार 784, बीपीएल 63 हजार 842 पैकी 54 हजार 731, प्राधान्य कुटुंबात 1 लाख 24 हजार 612 पैकी 1 लाख 16 हजार 664 कार्डधारकांचे लिंकिंग झाले असून काम प्रगतिपथावर सुरू आहे. 

आधार लिंकिंग वितरण प्रणाली सॉफ्टवेअरद्वारे धान्य उचल करावी ः जिल्ह्यातील 1183 दुकानांपैकी 500 दुकानात जून महिन्याचे धान्य पोहोचविण्यात आले आहे.उर्वरित दुकानांचे धान्य 10 तारखेपर्यंत पोहोचविण्यात येईल. पात्र शिधापत्रिकाधारकांनी आधार लिकिंग सार्वजनिक वितरण प्रणाली सॉफ्टवेअरद्वारे सदर धान्याची उचल करावी. तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आधार लिंक केले नाही त्यांनी दुकानदाराकडे आधारची झेरॉक्स प्रत जमा करावी. सर्व  रास्तभाव दुकानात तूरडाळ उपलब्ध असून ती प्रतिकिलो 35 रुपये दराने उपलब्ध आहे. ती पात्र शिधापत्रिकाधारकांनी आवश्यक तेवढी विकत घ्यावी. -एस. डी. मांडवगडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, परभणी.