Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Marathwada › जनतेच्या रक्षकांच्या निवार्‍यांनाच सुरक्षेची गरज 

जनतेच्या रक्षकांच्या निवार्‍यांनाच सुरक्षेची गरज 

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:35AMपरभणी :  प्रदीप कांबळे

जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीय मात्र असुरक्षित आहेत. शहरातील पोलिस मुख्यालयाच्या बाजूसच पोलिसांची शासकीय वसाहत आहेत. परभणी शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी व अधिकारी ही या वसाहतीमध्ये वास्तव्य करतात. ड्युटीसाठी बाहेर गेलेल्या या पोलिसांच्या कुटुंबीयांना मात्र अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत वसाहतीतील कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. शहरातील जनतेच्या संरक्षणासाठी दिवसरात्र रस्त्यावर उभे राहून गस्त घालणार्‍या पोलिसांच्या कुटुंबीयांना मात्र दहशतीखाली राहण्याची वेळ आली आहे. वसाहतीला चारही बाजूने संरक्षण भिंत नसल्याने वसाहतीत कोणाचाही मुक्तसंचार होणे सहज सोपे झाले आहे. 

चार गेट असलेल्या या वसाहतीला सुरक्षित संरक्षक भिंतही बांधण्यात न आल्याने या चार गेटचा वापर कमी तर अन्य ठिकाणच्या रस्त्यावरून जास्त लोकांची ये-जा होत असल्याची वास्तविकता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेसाठी हातात शस्त्र घेऊन पहारा देणार्‍या पोलिसांच्या वसाहतीला मात्र संरक्षण नसल्याने वसाहतीच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाला नसल्याचे मत कर्मचार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वसाहतींमध्ये राहणारे बहुतांश कर्मचारी आपल्या ड्युटीसाठी रात्री-बेरात्री घराबाहेर जातात. अनेकवेळा बहुतांश कर्मचारी हे बंदोबस्ताच्या कामासही सामूहिक कर्तव्य निभावण्यात व्यस्त असतात. अशावेळी या वसाहतींमध्ये केवळ महिला, लहान मुले व वृध्द माणसेच वास्तव्यास असतात.  याचा गैरफायदा घेऊन आजू-बाजूच्या परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वसाहत परिसरात येऊन स्वतःचे गैरमार्ग सुरू करतात. 

पडलेल्या व जीर्ण झालेल्या घरांमध्ये बेकायदेशीरपणे घोळक्याने बसून मद्यसेवन करणे, जुगार खेळणे एवढेच नाहीतर येणार्‍या-जाणार्‍या महिला व युवतींना नाहक त्रास देणे असे प्रकार नेहमीच सुरू असतात. शिवाय चोरी करण्याच्या उद्देशाने अनेक जण या परिसरात संचार करतात अन्  लहान-मोठ्या वस्तू उचलून घेऊन पसार होतात. असे अनेक प्रकार अनेकवेळा वसाहतीमध्ये घडले असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. यामुळे या वसाहतीच्या संरक्षणाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अन् पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी कर्मचारी नियुक्त करावेत, अशी अपेक्षाही वसाहतीतील कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.