Fri, Jul 19, 2019 01:32होमपेज › Marathwada › सशस्त्र सीमा दलाच्या स्थलांतराची अफवा!

सशस्त्र सीमा दलाच्या स्थलांतराची अफवा!

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 12:39AMआखाडा बाळापूर : प्रतिनिधी

कळमनुरी तालुक्यातील येलकी येथे सशस्त्र सीमा दलाचे युनिट असून यासाठी आतापर्यंत जवळपास 55 कोटींचा खर्च झाला असताना काही दिवसांपूर्वीच येथील जवानांना बिहार राज्यातील बेतीया येथे पाठविण्यात आल्याने एसएसबीचे स्थलांतर होत असल्याची चर्चेने जोर धरनला होता. मात्र स्थानिक एसएसबीच्या अधिकार्‍यांनी ही अंतर्गत प्रक्रिया असून येलकी येथील युनिटचे स्थलांतर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  दुसरीकडे मात्र कळमनुरी तालुक्यात स्थलांतराच्या विरोधात जनमत चांगलेच तापले आहे.

जिल्ह्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी, हिंगोलीच्या विकासास चालना मिळावी यासाठी तत्कालीन आमदार तथा विद्यमान खासदार राजीव सातव यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडून येलकी येथे एसएसबीचे युनिट मंजूर करून घेतले होते. आतापर्यंत येलकी येथे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासासाठी जवळपास 55 कोटी खर्च करण्यात आले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वीच एसएसबीचे स्थलांतर बिहार राज्यातील बेतीया येथे होणार असल्याची चर्चा सुरू झाली; परंतु यासंदर्भात एसएसबीच्या स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता येलकी येथील केंद्र स्थलांतरी होणार नसून नियमित्त प्रक्रियेनुसार येथील जवानांना दुसरीकडे पाठविण्यात आले आहे. यथे पुन्हा नव्याने जवान येणार असल्याची माहिती स्थानिक अधिकार्‍याने दिली आहे.

एसएसबीचे स्थलांतर होणार असल्याची निव्वळ अफवा असल्याचा दावा करीत सांगितले की, सध्या जवान येथून गेले असले तरी ही नियमित्त चालणारी प्रक्रिया आहे. लवकरच दुसरे युनिट येथे कार्यरत होईल. याला कुठलाही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकार्‍यांनी सांगितले. 

असा कुठलाही प्रकार नाही

येलकी येथे एसएसबीचे युनिट स्थलांतरित होणार असल्याची चर्चा झाल्याने काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस, मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदार प्रतिभा गोरे यांना निवेदन देऊन स्थलांतरास कडाडून विरोध दर्शविला. एसएसबीच्या स्थलांतरावरून सर्वच राजकीय पक्षांनी प्रसिद्धीची संधी साधत निवेदन बाजी केली असली तरी असा कुठलाही प्रकार   नसल्याने एसएसबीच्या स्थानिक अधिकार्‍यांनी सांगितले.