Wed, Jun 26, 2019 11:31होमपेज › Marathwada › कॉमनवील मोफत रोटी बँकेने जोपासली माणुसकी

कॉमनवील मोफत रोटी बँकेने जोपासली माणुसकी

Published On: Jan 29 2018 1:41AM | Last Updated: Jan 29 2018 12:14AMअंबासाखर : प्रतिनिधी

येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात गेल्या वर्षभरापासून कार्यरत असलेल्या मोफत रोटी बँकेने माणुसकी जोपासत समाजातील गोर-गरीब व गरजू लोकांना त्यांची भूक भागविण्यासाठी रोटी देऊन दिलासा देण्याचे काम केले  असल्याचे प्रतिपादन डॉ. सुधीर देशमुख यांनी केले. 

अंबाजोगाई शहरातील 11 तरुणांनी एकत्र येत माणवतेचा उदात्त दृष्टीकोण समोर ठेवून कॉमनवील मल्टिपर्पज चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांना दररोज 200 भाकरी व लोणचे देऊन त्यांची भूक भागविली आहे. 26 जानेवारी 2017 रोजी सुरू झालेल्या या उपक्रमाला 26 जानेवारी रोजी  एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्त कॉमनवील ग्रुपने आपला प्रथम वर्धापन दिन साजरा केला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.द्वारकादास लोहिया, अमर हबीब, डॉ. सुधीर देशमुख, डॉ. सिद्धेश्‍वर बिराजदार, शंकर बुरांडे, मौलाना हाजी रफिक, मौलाना मुफ्ती रफत, मौलाना रमजान, अनिकेत लोहिया, फादर संजय अ‍ॅन्थोनी, कृष्णा पुजारी, सुरकार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना अनिकेत लोहिया यांनी रोटी बँकेच्या विधायक उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तर कृष्णा पुजारी यांनी हा उपक्रम सर्वधर्म समभाव जोपासणारा असल्याचे सांगुन कॉमनवील ग्रुपचे अभिनंदन केले. मौलाना हाजी रफिक यांनी रोटी बँकेच्या उपक्रमाची प्रसंशा करून इस्लाम धर्मात सांगितल्या प्रमाणे कॉमनवील ग्रुपचे तरुण विधायक काम करीत आहेत असे सांगितले. 

दररोज दोनशे भाकरी

आमच्या गु्रपमधील सर्व 11 सदस्य हे वैयक्तिक सहभागातून व लोकसभागातून दररोज 200 भाकरी व लोणचे मोफत देत आहोत. याकामी महिन्याला सरासरी 40 हजार रूपये एवढा खर्च येत असल्याचे सांगून लवकरच कॉमनवील मल्टिपर्पज चॅरीटेलब ट्रस्ट मोफत रोटी बँकेची दुसरी शाखा अंबाजेागाई येथील बसस्टँड परिसरात सुरू करणार असल्याची माहिती अध्यक्ष हाकीम पठाण यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेराज पठाण यांनी करून उपस्थितांचे आभार हाकिम पठाण यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉमनवील मल्टीपर्पज चॅरीटेलब ट्रस्टचे अध्यक्ष हाकिम पठाण, उपाध्यक्ष माजेद शेख, सचिव शफी अहेमद कागजी,उपसचिव अयाज काझी, कोषाध्यक्ष आसरार मोमीन, सदस्य शेराज खान, नदीम शेख,आमेर उस्मानी, मुजम्मील सय्यद, असद शेख, शाफे शेख आदींनी परिश्रम घेतले.