Wed, Jun 26, 2019 11:30होमपेज › Marathwada › खडतर रस्ते होणार चकाचक

खडतर रस्ते होणार चकाचक

Published On: Mar 07 2018 2:44AM | Last Updated: Mar 07 2018 2:29AMबीड : दिनेश गुळवे

वर्षानुवषार्र्ंपासून चाळणी झालेल्या रस्त्यांवरून प्रवास करून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या हाडाची काडं झाली.  काही गावांचे रस्ते तर चारचाकी वाहन जाण्याजोगेही नसल्याने त्या गावांशी सोयकरीक करतानाही पाहुणे दहावेळेस विचार करतात. अशी दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांचे भाग्य आता उजळणार आहे. दहा रस्त्यांची कामे होत असल्याने ग्रामीण विकासालाही गती मिळणार आहे. ग्रामीण भागाचा  विकास हा तेथील रस्त्यांवर अवलंबून आहे.  असे असले तरी जिल्ह्यातील काही प्रमुख रस्त्यांची गेल्या अनेक वषार्र्ंपासून अतिशय दुरवस्था झाली आहे. काही रस्त्यांवर डांबराचा एक कणही राहिलेला नाही, तर अनेक ठिकाणी  मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.

काही रस्त्यांवर खडी पसरलेली आहे. अशा रस्त्यांवरून दूध उत्पादक, विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांना दररोज प्रवास करावा लागतो. अनेकदा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातही झालेले आहेत. खराब रस्त्यांमुळे ग्रामीण भागातून रुग्ण, गर्भवती महिला यांना शहरात आणण्यासाठीही अनंत यातना सहन कराव्या लागतात.  ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्त्यांची नितांत गरज आहे. ही गरज ओळखून आता प्रमुख असलेल्या दहा रस्त्यांवर 21 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या निधीतून डांबरीकरण व दुरुस्ती करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या कामास याच महिन्यात सुरुवात होणार आहे.