Wed, Mar 20, 2019 02:35होमपेज › Marathwada › स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 10 2018 12:02AMगेवराई : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील राक्षसभुवन फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. साखर कारखान्यांनी उसाचे बिल एफआरपी प्रमाणे शेतकर्‍यांना तत्काळ देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन झाले.

तालुक्यात ऊस बागायत क्षेत्र मोठे आहे. जयभवानी सहकारी साखर कारखाना, समर्थ कारखाना महाकाळा, छत्रपती साखर कारखाना-चिंतेगाव, छत्रपती कारखाना -माजलगाव, समृद्धी शुगर, अंबा सहकारी साखर कारखाना आदी कारखान्यांनी येथील शेतकर्‍यांचा ऊस दोन-तीन महिन्यांपूर्वी नेलेला आहे, मात्र काही कारखान्यांकडून अद्यापही एफ.आर.पी.सह पहिला हप्ता मिळालेला नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ऊस गाळपाला गेलेल्या दिनांकापासून एफ.आर.पी. 14 दिवसांत देणे बंधनकारक आहे. तरीही ती शेतकर्‍यांना दिली नसल्याने संबंधीत साखर कारखान्यांवर कारवाई करून शेतकर्‍यांना तत्काळ बिले देण्यात यावी या मागणीसाठी औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील राक्षसभुवन फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 आंदोलनकर्त्यांनीसाखर आयुक्त प्रतिनिधी रशीद शेख, तहसीलदार संजय पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डाके, पं.स.सदस्या पूजा मोरे, कुलदीप करपे, जयदीप वायळकर, बाळासाहेब काटे, नवनाथ आबूज, योगेश्‍वरी डाके, विक्रम सुखदेव, संग्राम शिंदे, मिलिंद तायड आदींसह शेतकर्‍यांची मोठी उपस्थिती होती. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Tags : Marathwada, Road, block, movement, Swabhimani Shetkari Sanghatana