होमपेज › Marathwada › मोडकळीस आलेल्या इमारतींपासून धोका

मोडकळीस आलेल्या इमारतींपासून धोका

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 11:53PMपरभणी : प्रतिनिधी

मागील 60 ते 70 वषार्र्ंपूर्वी बांधलेल्या अनेक इमारती शहरात उभ्या आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यातील पाण्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु शहर महानगरपालिकेकडून कागदी घोडे नाचवत दरवर्षी नोटीस दिल्या जातात, परंतु प्रत्यक्षात कारवाई मात्र होत नाही. यामुळे गेल्या अनेक वषार्र्ंपासून त्या इमारती जशासतशा उभ्या असल्याने पावसाळ्यात त्या पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

परभणी शहरातील विविध भागांमध्ये 26 मे 2014 रोजी नगर विकास विभागातर्फे दिलेल्या माहितीप्रमाणे मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या 77 आहे. त्यात एक कॉरपोरेट तर खासगी 76 इमारतींचा समावेश आहे. त्याचबरोबर शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातर्फे 31 मे 2013 रोजी काढलेल्या नोटीसनुसार 7 धोकादायक इमारती आहेत अशी माहिती आहे. यापैकी 50 ते 60 वषार्र्ंपूर्वी बांधलेल्या अनेक इमारती अद्यापही तशाच उभ्या आहेत. या इमारतींना मनपाकडून पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नोटीस देऊन इमारत पाडण्यास सांगितल्या जाते, पण यावर कारवाई करण्याकडे प्रशासन दिरंगाई करत असल्याचे दिसून 
येत आहे. 

मोडकळीस आलेल्या इमारतींची पाहणी करून अभियंत्यांच्या सल्ल्याने त्या इमारतीच्या डागडुजीसंदर्भात अथवा पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे आहे, परंतु इमारतीचे मालकही याकडे लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनपाने मोडकळीस आलेल्या इमारतींवर हातोडा चालवावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.