Thu, Jun 27, 2019 12:25होमपेज › Marathwada › दिखाऊ वृक्षारोपण करणार्‍यांना लागणार लगाम 

दिखाऊ वृक्षारोपण करणार्‍यांना लागणार लगाम 

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 06 2018 10:14PMपाथरी : सुधाकर गोंगे

विविध शासकीय कार्यालयांकडून वृक्षारोपणाचा नुसता गाजावाजा करून कार्यक्रमाची छायाचित्रे काढून वृक्षारोपणाचा फार्स करण्यात येत असल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत.  कार्यालयांची ही बनवेगिरी रोखण्यासाठी वृक्षारोपणावर आता वॉच राहणार असून, वृक्षारोपणासाठी खोदलेले खड्डे आणि प्रत्यक्ष लागवड केलेल्या वृक्षांची छायाचित्रे वन खात्याच्या माय प्लँट या अ‍ॅपवर अपलोड करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे दिखाऊ वृक्षारोपण करणार्‍यांना आता लगाम बसणार आहे. पावणेदोन लाख वृक्षांची लागवड पाथरी तालुक्यात होणार असल्याने याची सर्व तयारी वन विभागाकडून करण्यात आली आहे.

राज्य सरकारने वनयुक्त शिवार या योजनेनुसार 13 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक सरकारी विभागांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जुलै महिन्यात राज्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. 

खोटेपणा होणार उघड 

वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे आदेश प्रत्येक शासकीय कार्यालयाला देण्यात आले आहेत.खड्डा खोदल्यानंतर त्याची छायाचित्रे काढून ते छायाचित्र वनविभागाने उपलब्ध करून दिलेल्या माय प्लँट या अ‍ॅपवर अपलोड करावे लागणार आहेत. त्यामुळे हा खड्डा कोठे खोदण्यात आला आहे ? त्याचा आकार योग्य आहे की नाही ? हे कळणार आहे व त्याची माहिती संकलित होणार आहे. त्यामुळे वृक्षारोपणाचा दिखावा करता येणार नाही व खोटेपणा उघड होणार आहे.

चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे : कोल्हे

पर्यावरणीय बदलामुळेच वारंवार दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.तापमानात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. गारपीटीने वृक्षांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. दरवर्षी गारपीट होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून हे थांबवता येऊ शकते. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून पर्यावरण संतुलित राखण्यास हातभार लावणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन पांडुरंग कोल्हे यांनी केले आहे.