होमपेज › Marathwada › महिन्याकाठी 6 लाखांचा दुरुस्ती खर्च

महिन्याकाठी 6 लाखांचा दुरुस्ती खर्च

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 11:05PMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्ह्यात दिवसेंदिवस खराब होत चाललेल्या रस्त्यांमुळे सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना बसत आहे. आजमितीस हिंगोली आगारात एकूण 58 गाड्या उपलब्ध असून दिवसाकाठी यातून तब्बल 5 ते 6 लाखांवर निव्वळ उत्पन्‍न मिळते, तर दर महिन्याला केवळ दुरुस्तीवर 6 लाख रुपये खर्च होत असल्याचे चित्र आहे.

राज्य परिवहन महामंडळ गेल्या काही वर्षांपासून चांगलेच या न त्या कारणामुळे अडचणीत सापडले आहे. एकीकडे कर्मचार्‍यांना तुटपुंज्या पगारी दिल्या जात असल्याने अनेक कर्मचारी संघटनांनी शासनाविरोधात आवाज उठवला. मात्र आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. आजमितीस महामंडळाचा संपूर्ण डोलारा हा कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवर असल्याचे पाहावयास मिळेल. या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून रापम आज लाखो रुपयांचे उत्पन्‍न मिळवत आहे. मात्र कर्मचार्‍यांच्या पदरी काहीच पडत नाही. तर दुसरीकडे महामंडळ गाड्यांच्या दुरुस्तीवर दर महिन्याला तब्बल 5 ते 6 लाखांवर खर्च करते. यास जिल्हाभरातील खराब होत चाललेले रस्ते कारणीभूत असल्याची बाब समोर आली आहे.
आजमितीस हिंगोली येथील आगारात एकूण 58 गाड्या उपलब्ध आहेत. यामध्ये 2 शिवशाही, 4 सेमी लक्झरी, 21 मानव विकास योजनेअंतर्गत, 31 साध्या बस (परिवर्तन) अशा 58 गाड्यांचा समावेश आहे. त्या दररोज जवळपास 22 हजार कि. मी. चा पल्‍ला गाठतात. या गाड्यांसाठी दिवसाला 3 हजार 500 लिटर डिझेल लागते, तर मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे गाड्यांना मोठा फटका बसत आहे.

खराब रस्त्यांमुळे टायर, स्प्रिंग, बॉडीची कामे, पाटे, काचा, इंजिनचे काम जास्त निघत आहेत. त्यामुळे एका दिवसाचे उत्पन्‍न हे दर महिन्याच्या दुरुस्तीवर होत आहे. पूर्वी हाच खर्च केवळ तीन लाखांच्या आत होता. गाड्या वाढल्यामुळे हळूहळू मेन्टेनन्सचा खर्च वाढत आहे. सदर गाड्यांना तत्काळ दुरुस्त करण्यासाठी एकूण 33 कर्मचारी दोन शिफ्टमध्ये दिवस-रात्र काम करतात. त्यात एखादा महत्त्वाचा पार्ट आणावयाचा म्हटल्यास तो परभणी येथील विभागीय कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. तेव्हाच गाड्यांचे काम पूर्णत्वास जाते. नसता पार्ट बसेपर्यंत त्या गाडीऐवजी दुसरी गाडी प्रवाशांसाठी सोडली जाते.

Tags : Marathwada, Repair, expenses, 6 lakhs, per, month