Sun, Jul 21, 2019 12:01होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांना दिलासा देणारी धोरणे आखणार : राहूल गांधी

शेतकर्‍यांना दिलासा देणारी धोरणे आखणार : राहूल गांधी

Published On: Apr 16 2019 2:18AM | Last Updated: Apr 16 2019 2:18AM
नांदेड :  प्रतिनिधी 

कर्जबुडवे फरार होतात, मात्र कर्जबाजारी शेतकर्‍याला गजाआड टाकले जाते. आता हे होऊ देणार नाही. शेतकर्‍यांवर फौजदारी खटले दाखल केले जाऊ नयेत असा कायदा सतेत आल्यानंतर आणण्याचे आश्‍वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. महाआघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकर्‍यांना दिलासा देणारी धोरणे आखली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नांदेड येथे सोमवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. आपल्या भाषणात राहुल यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण यांचे स्मरण केले. चौकीदार चोर है या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करीत राहुल म्ह्णाले की अनिल अंबानी यांना राफेलचे कंत्राट मिळाले आहे. पण त्यांच्या कंपनीत विमानाची निर्मितीच होत नाही. या विषयात पंतप्रधान खोटे बोलत असून त्यांची जनतेसमोर खरे बोलण्याची हिंमत नाही. देशाच्या तिजोरीची चावी नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींसारख्या मूठभर  भांडवलदार मित्रांच्या हातात दिली आहे, ती भारतीय जनतेच्या हातात देण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची असल्याचे ते म्हणाले. नोटाबंदीचा  सगळ्यात जास्त त्रास महिलांना झाला, म्हणून काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात आखलेल्या ‘न्याय’ योजनेतून दिले जाणारे आर्थिक साहाय्य कुटुंबातील महिलेच्या खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. सामान्य जनतेवर पंतप्रधानांनी अन्याय केला. त्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याचे त्यांनी सांगितले.