Tue, Jul 16, 2019 14:17होमपेज › Marathwada › बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा

बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMवसमत : प्रतिनिधी

यंदा अत्यल्प पावसामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे चित्र आहे. परिणामी खरीप हंगामातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांचा उतारा घटल्याचे दिसून आले. कपाशीवर अचानक बोंडअळीने हल्‍ला केल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन शासनाने सर्व्हे करून नुकतीच आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने वसमत तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना तब्बल 3 कोटी 97 लाख रुपयांचे अनुदान वाटप केले जाणार आहे.

खरीप हंगाम 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये कापसावर बोंडअळींसह मोठ्या प्रमाणात तुडतुडे रोग पडल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले. अशा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने नुकतीच आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे वसमत तालुक्यातील शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात तब्बल 3 कोटी 97 लाख रुपयांचे अनुदान वाटप केले जाणार आहे. तालुक्यासह सर्वत्र यंदाच्या खरीप हंगामात कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाचा उतारा चार ते पाच क्‍विंटलवर आला. त्यामुळे परिसरातील शेतकरी कर्जबाजारी झाला होता.  या संदर्भात राज्य शासनाने तत्काळ तालुक्यातील बोंडअळी पडलेल्या कापसाचे पिकाचे पंचनामे करून नुकसानग्रस्त कपाशीचे प्रत्यक्षात सर्व्हे कृषी विभाग व तहसील विभागामार्फत करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात वसमत तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 14 कोटी 91 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आगामी दिवसांत तीन टप्प्यांमध्ये अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वसमत तालुक्यास 3 कोटी 97 लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. सदर अनुदान हेक्टरी 6 हजार 800 रुपये याप्रमाणे वाटप केले जाणार आहे. तर तालुक्यातील लहान गावांना प्राधान्य देत त्यांच्यापासून अनुदान वाटपास सुरुवात होईल. तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, हट्टा यांसह मोठ्या गावांचा शेवटी नंबर लागणार आहे.