Tue, Apr 23, 2019 02:28होमपेज › Marathwada › लातूर : नाकारलेले सोयाबीन निघाले विक्रीयोग्य

लातूर : नाकारलेले सोयाबीन निघाले विक्रीयोग्य

Published On: Dec 08 2017 7:30PM | Last Updated: Dec 08 2017 7:30PM

बुकमार्क करा

प्रतिनिधी : लातूर

सोयाबीन खरेदी केंद्रावर अधिकाऱ्यांकरवी होत असलेली शेतकऱ्यांची अडवणूक खुद्द सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी उघडी पाडली. नाकारलेले सोयाबीनची तपासणी केली असता हे सोयाबीन विक्रीयोग्य निघाल्याने ग्रेडरचे पितळ उघडे झाले. या प्रकारानंतर दोषी अधिकाऱ्यांवर  कारवाईचे आदेश सहकारमंत्री देशमुख यांनी दिले. तर  सहा जिल्ह्यांतील शेतमाल खरेदी केंद्र , शेतमाल तारण योजना आदिंची ते पाहणी करणार असून, याची सुरुवात लातूर मधून करण्यात आली.

प्रारंभी सहकारमंत्री देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे पदाधिकारी, सचिव, वखार मंडळाचे अधिकारी व सहाय्यक निबंधकांची बैठक घेतली. त्यानंतर सोयाबीन खरेदी केंद्रास भेट दिली. 

केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्रीस आले होते. तेथे खरेदी योग्य नाही म्हणून नाकारलेल्या सोयाबीनच्या गोण्यांची मोठी थप्पी होती. या सोयाबीनच्या पोत्यांतील सोयाबीन तपासणी केली असता हे सोयाबीन खरेदी योग्य असल्याचे निर्दशनास आले. या प्रकारामुळे देशमुख जाम संतापले व त्यांनी संबधीत ग्रेडरची चांगलीच कानउघडणी केली. 

विक्रीयोग्य असलेले धान्य का नाकारले ? असा प्रश्न त्यांनी ग्रेडरला केला असता त्याला काहीच उत्तर देता आले नाही. तर संबंधीत अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. अशा प्रकारामुळे नाहक शासनाची बदनामी व शेतकऱ्यांची अडवणूक होत असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे देशमुख यांनी संबंधीत अधिकाऱ्यास खडसावले असल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

शेतकऱ्यांच्या उद्रेकाची वाट पाहू नका...

शेतकऱ्याच्या हितासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांचा फज्जा अधिकाऱ्यांच्या बेफिकीरीने उडत असल्याचे अनेक ठिकाणी आढळत आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करुन शेतकऱ्याच्या उद्रेकाची वाट पाहू नका असे सहकारमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

पैशासाठी अडवणूक

खरेदी केंद्र ही अधिकाऱ्यांसाठी कमाईचे अड्डे झाले आहेत. माल चांगला असला तरी काहीतरी कारण देऊन तो प्रारंभी नाकारला जातो. तो परत नेण्यास सांगतले जाते. त्यामुळे शेतकरी धास्तावतो. संबधीताच्या हातावर एखादा हजार टेकवले की माल विक्रीयोग्य होतो. सर्वच केंद्रावर अशी अडवणूक होत आहे... राजकुमार सस्तापूरे, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना