होमपेज › Marathwada › रेकॉर्ड तपासूनच पीकविम्याचा निर्णय 

रेकॉर्ड तपासूनच पीकविम्याचा निर्णय 

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 04 2018 10:42PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील सव्वा दोन लाख शेतकर्‍यांना सोयाबीन पिकाचा विमा मिळावा यासाठी 26 जूनपासून जिल्हा कचेरीसमोर शेतकर्‍यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाकडे शासन प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याने शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला. त्याचा पहिला टप्पा म्हणून ठरल्याप्रमाणे 4 जुलै रोजी खा. संजय जाधव, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास जोगदंड, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांशी चर्चा करताना जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सोयाबीन पीक विमाप्रश्‍नी सॅटेलाईट रेकॉर्ड पाहून निर्णय घेतल्या जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. 

खरीप हंगाम 2017-18 मध्ये 55 दिवसांचा पावसाचा खंड पडून शेतकर्‍यांच्या सोयाबीन पिकाची राखरांगोळी झाली. सोयाबीनच्या पेरणीसाठी झालेला खर्चही शेतकर्‍यांचा निघाला नाही. यामुळे पीक संरक्षणाची अपेक्षा ठेवून जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक विमा काढला. मात्र रिलायन्स कंपनीशी हातमिळवणी करून कृषी विभागातील, जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांनी पूर्णा तालुक्यातील लिमला मंडळातील  शेतकर्‍यांचे उबंरठा उत्पन्‍न जास्तीचे दाखवून सोयाबीन पिकाचा विमा त्यांनी नाकारला. 

त्यामुळे त्या क्षेत्रातील 7007  शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिले. त्यामुळे शेतकर्‍यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून पंतप्रधान पीक विमा संरक्षण समितीच्या माध्यमातून जि. प. सदस्य श्रीनिवास जोगदंड, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. विलास बाबर यांच्यासह शेतकर्‍यांनी लढा सुरू केला. 4 जुलै रोजी या लढ्यास व्याप्‍ती मिळाली असून प्रशासनास जागे करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होऊन त्यांनी शासन-प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्‍त केला. 

यावेळी खा. जाधव, माजीमंत्री वरपूडकर, जि. प. सदस्य जोगदंड, कॉ.क्षीरसागर, कॉ. बाबर यांच्यासह जवळपास शंभर शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांशी तब्बल दोन तास चर्चा केली. यावेळी शेतकर्‍यांच्या सोयाबीन पीक विम्यावर शासन प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक निर्णय देऊन न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, सोनाली देशमुख, माजी खा. सुरेश जाधव, गणेश घाटगे, सखूबाई लटपटे, सदाशिव देशमुख, राम खराबे, अर्जुन सामाले, अतुल सरोदे, शिवलिंग बोधने, दिलीप आंभोरे, व्यंकट शिंदे यांचाही शिष्टमंडळात समावेश होता.