Thu, Jul 18, 2019 10:50होमपेज › Marathwada › कडू कारल्याच्या विक्रमी उत्पादनातून आर्थिक गोडवा

कडू कारल्याच्या विक्रमी उत्पादनातून आर्थिक गोडवा

Published On: Apr 14 2018 1:42AM | Last Updated: Apr 14 2018 1:30AMआर्वी : जालिंदर नन्नवरे 

लहरी हवामानाला तोंड देत उपलब्ध पाण्याचा काटकसरीणे वापर, मल्चिंग आणि ठिबकचा योग्य उपयोग करून अनेक शेतकरी शेतीतून सोनं पिकवत आहेत. आर्वी येथील एका शेतकर्‍याने कारल्याच्या विक्रमी उत्पादनातून चांगला नफा कमवत कडू कारल्याच्या माध्यमातून जीवनात गोडवा आणला आहे.

आर्वी गावातील काकासाहेब भोसले या तरुण शेतकर्‍याने पारंपरिक कापूस उत्पादनाला फाटा देत शेती भाजीपाला लागवडीखाली आणली. त्यांच्याकडे स्वत:ची चार एकर शेती आहे. यावर्षी काकासाहेबांनी शेतीत कारल्याची लागवड केली. कारल्याचे पीक ऐन उन्हाळ्यात मार्च मध्ये घेतले. पाण्याचा कमी वापर आणि तण व्यवस्थापनासाठी त्यांनी मल्चिंगचा वापर केला. यासाठी 25 हजार रुपये खर्च आला.  

कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पिक घेण्यावर त्यांचा भर असतो. पाणी वाचले तर आणखी एका हंगामाचे नियोजन करता येते असे ते सांगतात. म्हणूनच ठिबकद्वारे पाणी आणि विद्राव्य खते दिली. कारल्याचा वेल चढ़वण्यासाठी बांबू, तार, दोर इत्यादींचा आधार दिला. केवळ दीड महिन्यात कारल्याचे पीक अतिशय डौलदारपणे शेतात उभे राहिले. या पहिल्या पिकातून त्याला लागवडीपासून ते विकण्यापर्यंतचा सगळा खर्च वगळता 1 लाखाचे उत्पादन अपेक्षित आहे आणि तेही केवळ 18 गुंठे क्षेत्रात.

आता ढोबळी मिरची

केवळ कारल्याचे उत्पन्न घेऊन थांबत नाहीत तर लगेच पुढील महिन्यात ढोबळी मिरचीची लागवड करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. सतत वेगवेगळे आधुनिक तंत्र वापरून विविध पिके घेण्याचा प्रयत्नते करतात. नवीन प्रयोग करताना त्यात अपयश आले, तोटा झाला तरी त्यातुन मिळणारा अनुभव समृद्ध करून जातो. या अनुभवाच्या शिदोरीवर पुढचा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी होतो असे काकासाहेब भोसले आत्मविश्वासाने सांगतात.