Tue, Jul 16, 2019 09:39होमपेज › Marathwada › आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उभारी

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उभारी

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 25 2018 9:43PMबीड : प्रतिनिधी

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना  स्वत:च्या पायावर उभा करण्यासह त्यांना आवश्यक असलेली शासकीय मदत देण्यासाठी उभारी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत शुक्रवारी अधिकारी, कर्मचारी यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.सततचा दुष्काळ, सिंचनाचा अभाव, कर्जबाजारीपणा यातून मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. शेतकर्‍यांनी कर्जापायी आत्महत्या करू नये, यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. असे असतानाही दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या होत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबास आधार देण्यासाठी, अशा परिस्थितीत त्यांना मदत करण्यासाठी, त्यांंच्या अडी-अडचणी जाणून घेऊन त्यांना कोणत्या योजना देता येतील, यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी उभारी हा कार्यक्रम सुरू केला आहे. 

या अंतर्गत 2012 ते 2018 दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांना मदत दिली जाणार आहे. यासाठी या अगोदरही दोन वेळेस (15 नोव्हेंबर 2017 व चार एप्रिल 2018) महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या घरी जाऊन पाहणी केली आहे. यावेळी अनेक शेतकर्‍यांनी घरकूल, रोहयोतून विहीर, फळबाग, ठिबक सिंचन, छोट्या व्यवसायासाठी कर्ज, शेतीसाठी औजारे, मृत्यू पावलेल्या शेतकर्‍याच्या नावे असलेले घर, शेत वारसाच्या नावे करणे, निराधार मानधन सुरू करावे अशा मागण्या केल्या होत्या. 

गतवेळी केलेल्या मागण्यांची पूतर्त संबंधित विभागाकडून झाली आहे, किंवा नाही, याची पाहणी शुक्रवारी महसूल पथकाने केली. यासह अपादग्रस्त शेतकर्‍यांना आणखी काय हवे आहे का, याचीही माहिती घेतली. महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी घरी जाऊन विचारपूस करून माहिती घेतली. जिल्ह्यातील एक हजार 113 आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरी जाऊन अशी पाहणी करून त्यांना उभारी देण्यात येणार आहेत. यातील बहुतांश शेतकर्‍यांच्या घरी शुक्रवारी अधिकारी,कर्मचारी दाखल झाले होते.