Mon, Apr 22, 2019 22:03होमपेज › Marathwada › जिल्हाभरात रोहिण्या धुवाधार

जिल्हाभरात रोहिण्या धुवाधार

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 9:25PMबीड : पुढारी वृत्तसेवा

चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने सुखावला. जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून जिल्हाभरात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. नांगरट करून ठेवलेल्या शेतात पाणी साचले आहे. यामुळे आता शेतकर्‍यांना मशागत करण्यास सोपे जाणार आहे.  अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने नागरिकांची  दिवसभर धांदल उडाली होती. नालेसफाई न झाल्यो त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला आहे.

19 हजार क्विंटल हरभर्‍यावर पाणी

माजलगाव : प्रतिनिधी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टिएमसी आवारात असलेल्या खरेदी केंद्रांवर बारदाना व गोदाम नसल्याने 19 हजार क्विंटल हरभरा पडून आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसाने या हरभर्‍यावर पाणी पडले आहे. यातील काही हभर्‍याच्या तर घुगर्‍या झाल्या आहेत. खरेदी केंद्रावरील हरभरा सुरक्षीत रहावा, यासाठी सभापती डक, उपसभापती भोसले तळ ठोकून आहेत. खुल्या बाजारात भाव नसल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर हरभरा विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर आणला. येथे जवळपास तीन महिन्यांपासून काही शेतकर्‍यांनी हरभरा विक्रीसाठी आणला आहे, मात्र या खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याने खरेदी बंद आहे. खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी शासनाच्या गोदामात जागाच शिल्लक नसल्याने शेतकर्‍यांच्या हरभरा खरेदीचा लपंडाव सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांनी खरेदी बंद केल्याने 1650 शेतकर्‍याच्या नोंदी केलेला 18 हजार क्विंटल हरभरा मापाअभावी जाग्यावर पडून आहे.

काही शेतकर्‍यांनी पावसाच्या भीतीमुळे हरभरा झाकून ठेवला. हे शेतकरी माप होण्याची प्रतीक्षा करीत आहेत, दरम्यान या पूर्वीच शासनाने खरेदी केलेल्या मालासाठी गोदाम खुले करून दिले असते तर हजारो क्विंटल हरभर्‍याचे माप ही झाले असते. पावसात हरभरा भिजला सुद्धा नसता. मंगळवारी वडवणी येथील शासकीय धान्य गोदामामध्ये खरेदी केलेले धान्य ठेवले जात आहे. हे काम अगोदरच झाले असते तर मोठ्या प्रमाणावर हरभरा भिजून नुकसान झाले नसते. या बाजार समितीच्या टिएमसी आवारात असलेल्या 19 हजार 600 क्विंटल हरभर्‍यातील बराच हरभरा भिजला आहेत. खरेदी केंद्राने घेतलेला 1300 क्विंटल हरभराही भिजला. तहसीलदार एन.जी.झंपलवाड यांनी खरेदी केंद्रावर नुकसानीची पाहणी केली. मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मार्फत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.      

वडवणी तालुक्यात नद्यांना पूर

वडवणी : मंगळवारी पहाटे झालेल्या पहिल्याच पावसाने वडवणी तालुक्यातील बहुतेक नद्यांना पूर आला. मंगळवारी पहाटे तीन वाजता अचानक विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. गोठ्याबाहेर बांधलेली जनावरे झोडपून निघाली. मंगळवारी सकाळी सहा वाजता तर पावसाचा जोर आनखीनच वाढला. जवळपास दोन तास जोरदार व आणखी एक तास रिमझिम पाऊस झाला. या हंगामातील हा पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने तालुक्यातील अनेक गावांच्या नदीला पूर आला होता. मोरवड, पुसरा, हिवरगव्हाण, वडवणी येथील नदीला  आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती, दरम्यान पावसाने गावरान आंब्याचे नुकसानही झाले आहे.