Sat, Jul 20, 2019 02:54होमपेज › Marathwada › उस्मानाबादमध्ये डॉक्टर, कंत्राटदारांवर आयकरचे छापे

उस्मानाबादमध्ये डॉक्टर, कंत्राटदारांवर आयकरचे छापे

Published On: Apr 05 2018 10:34PM | Last Updated: Apr 05 2018 10:34PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

शहरातील काही प्रसिध्द दवाखाने तसेच डॉक्टरांवर आयकर विभागाने गुरुवारी छापे घातले. यासोबतच दोन कंत्राटदार, एक सोनोग्राफी सेंटर तसेच दोन ठोक औषध विक्रेत्यांचीही कसून चौकशी सुरु होती. याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा दिला नसला तरी शहरात दिवसभर आयकरच्या कारवाईची माहिती व्हायरल झाली.

शहरातील काही डॉक्टर तसेच वैद्यकिय क्षेत्रातील काही व्यावसायिक अशा 9 जणांवर आयकरने छापा टाकला. यात लातूर येथील अधिकारी व उर्वरीत औरंगाबादेतील अधिकारी, कर्मचार्‍यांनी सहभाग घेतल्याचे सांगितले जात होते. ही चौकशी साधारण 48 ते 72 तासापर्यंत चालण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या चार-पाच वर्षांपासून शहरातील अनेक बड्या व्यावसायिकांवर आयकरने छापा टाकण्याचे सत्र यंदाही कायम ठेवले आहे.

अधिकृत दुजोरा नाही
या छाप्यांची माहिती अधिकृतपणे कोणीही दिली नाही. स्थानिक प्रशासन अथवा पोलिस विभागानेही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

नॅशनल परमिटच्या कार
शहरात आज ज्या वैद्यकिय आस्थापनांवर छापे पडले त्या परिसरात नॅशनल परमिटच्या कारचा वावर दिसून आला. या वाहनांतूनच अधिकारी आले असावेत, अशी चर्चा होती.

रुटीन चौकशी
दरम्यान, आयकरची अशी कारवाई दरवर्षी होत असते. ज्यांनी उत्पन्‍न लपविले आहे ते उघड झाल्यास अशांवर दंडात्मक कारवाई होते. अशी चौकशी दरवर्षी होतच असते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 Tags : usmanabad city,  Income Tax Department