Mon, Apr 22, 2019 23:43होमपेज › Marathwada › आर. टी. ई. प्रवेश योजना बारगळली

आर. टी. ई. प्रवेश योजना बारगळली

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 9:15PMपरभणी : प्रतिनिधी

शासनाच्या आरटीई अ‍ॅक्ट 2009 अन्वये शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यातर्फे शासनाकडून मोफत प्रवेश योजना राबविल्या जाते.  पात्र लाभधारक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांतर्गत खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश देण्यात येतो. सन 2018 शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील 152 शाळांमध्ये 1502 जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे; परंतु अद्यापर्यंत केवळ 709 विद्यार्थ्यांची निवड करून  पहिल्या टप्प्यात 503 विद्यार्थ्यांचाच प्रवेश निश्‍चित केला आहे. त्यामुळे निवडलेल्यांपैकी 206 तर एकूण जागांपैकी 793  विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित असून त्यांना आता दुसर्‍या टप्प्याची वाट पाहत बसावे लागले आहे.  

इयत्ता 1 ली वर्गात प्रवेश घेण्यासाठी या योजनेअंतर्गत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासनस्तरावरून संबंधित शाळेस वितरित केली जाते. या योजनेचा लाभ आरटीईअंतर्गत इ. 8 वीपर्यंत दिला जातो. शासनाने मोठा गाजावाजा करून इंग्रजी शाळांतही आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले; परंतु परभणी जिल्ह्यात या योजनेचे तीनतेरा झाले असून शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे गरजू व पात्र विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. हजारो रुपये प्रवेश शुल्क आकारून जिल्ह्यातील इंग्रजी शाळांनी घोडेबाजार सुरू केला आहे. इंग्रजी व दर्जेदार शिक्षणांचा कांगावा करणार्‍या इंग्रजी खाजगी शाळांनी सातत्याने आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे. प्रवेशासाठी आलेल्या पालकांची दिशाभूल करून त्यांना प्रवेशासाठी असहकार्य दाखवायचे आणि प्रवेश देेणे टाळायचे हे जिल्ह्यात सर्रासपणे घडत असतानादेखील शिक्षण विभाग कुंभकर्णी झोप घेऊन शाळांच्या या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.

शासनाचे सक्‍त आदेश असतानादेखील अनेक शाळा पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासही टाळाटाळ करीत आहेत. शिवाय यातही पळवाट काढीत 25 टक्के आरक्षित आरटीई प्रवेशात धनदांडग्यांच्या मुलांना प्रवेश देऊन कोटा पूर्ण केल्या जात असल्याने ही योजना गरजूंपर्यंत पोहोचण्यात अनंत अडथळे निर्माण होत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांकडून शाळा व्यवस्थापनाच्या इच्छांची पूर्ती करणे शक्य नसल्याने पाल्याला प्रवेश नाकारल्या जात असल्याची भावनाही पालकांकडून व्यक्‍त करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आरटीई प्रवेश प्रक्रियेस गांभिर्याने घेऊन प्रवेश नाकारणार्‍या शाळांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही पालक वर्गांकडून करण्यात येत आहे.