Wed, Apr 24, 2019 15:56होमपेज › Marathwada › तूर खरेदी पुन्हा सुरू

तूर खरेदी पुन्हा सुरू

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 10:34PMबीड : प्रतिनिधी

बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात बंद झालेली तूर खरेदी केंद्रावरील काटे पुन्हा सुरू करण्याची परवानगी शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील तूर खरेदी आजपासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक सी. एच. बागवान यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. तूर खरेदीला पुन्हा परवानगी मिळाल्याने हजारो शेतकर्‍यांचा जीव भांड्यात पडला आहे.बीड जिल्हा खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक सी. एच. बागवान हे  वडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर पाहणी करण्यासाठी बुधवारी  आले होते. जिल्ह्यातील बीड, गेवराई, वडवणी आणि परळी या चार तालुक्यातील शासकीय तूर खरेदी केंद्रावरील खरेदी बीड जिल्हा खरेदी विक्री संघाच्या नियंत्रणाखाली होत आहे. तर इतर तालुक्यातील खरेदी यंत्रणा बाजार समितीच्या मार्फत होत आहे. बीड जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्रावर पुन्हा तूर खरेदी करण्याचे आदेश आले आहेत. बीड येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर बुधवारीच खरेदी चालू झाली मात्र गुरुवारपासून जिल्ह्यातील इतर सर्व तूर खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष मापे चालू होणार आहेत. 18 एप्रिल पर्यंत बीड जिल्ह्यातील 16925 शेतकर्‍यांच्या 168544 क्वींटल तुरीचे मापे झाले होते. अजूनही जवळपास दहा हजार शेतकरयांच्या तुरीचे मापे होणे बाकी आहे. जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार क्विंटल तूर शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. ही सर्व तूर खरेदी केंद्रावर घेतली जाणार आहे. 


आठवडी बाजारातील खासगी व्यापार्‍यांकडे शेतकर्‍यांची पाठ

वडवणी येथील बुधवारी आठवडी बाजार असतो. खासगी व्यापारी आपापले काटे रस्त्यावर लावून तूर खरेदी करतात. शासकीय तूर खरेदी केंद्रावरील तूर खरेदी बंद झाल्याने खासगी व्यापार्‍याला कमी भावाने तूर विकावी लागत होती, मात्र बुधवारी सकाळीच वडवणीतील शासकीय तूर खरेदी केंद्र गुरुवार पासून, पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती शेतकर्‍यांना मिळाली अन् शेतकर्‍यांनी तूर खासगी व्यापार्‍याला विकण्याचा निर्णय रद्द केला.


आज मेसेज पाठविणार

बीड जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकरयांच्या तुरीची ऑनलाइन नोंद करण्यात आली आहे. त्या सर्व शेतकर्‍यांना बुधवारपासून मेसेज पाठविण्यात येत आहेत. शेतकर्‍यांनी मेसेज आल्यावर दुसर्‍या दिवशी आपली तूर खरेदी केंद्रावर घेऊन यावे असे शासकीय तूर खरेदी यंत्रनेच्या वतीने सांगण्यात आले.


दैनिक ‘पुढारी’चा पाठपुरावा

बीड जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांची तूर अजूनही घरात पडून आहे. या बाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशीत करून, शेतकर्‍यांची कैफियत मांडली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी दैनिक पुढारीचे आभार मानले आहे.

Tags : Marathwada, Purchase, tur, will, resume