Tue, Mar 26, 2019 11:52होमपेज › Marathwada › टाकळीत तहसीलदारांसह डीवायएसपी तळ ठोकून

टाकळीत तहसीलदारांसह डीवायएसपी तळ ठोकून

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 29 2018 10:25PMपरभणी : प्रतिनिधी

तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे शनिवारी दुपारच्या सुमारास आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यात एक आंदोलक तर चार पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. दुसर्‍या दिवशी 29 जुलै रोजी सकाळपासूनच तहसीलदार विद्याचरण कडवकर व ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर हे टाकळी फाट्यावर तळ ठोकून होते. यातच येणार्‍या व जाणार्‍या प्रवाशांची चौकशी करून आधारकार्ड तपासणी करण्यात येत होती. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन दिवस बंद, धरणे, ठिय्या देणार्‍या आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ 28 जुलै रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तसेच टाकळी कुंभकर्ण येथेही पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत 4 पोलिस जखमी झाले आहेत. यावेळी टाकळी येथे अडीच वाजता पोलिसांनी फायरिंग केली. पण परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने परत जमावाला पांगविण्यासाठी एसआरपीएफच्या जवानांनी हवेत फायर केले. यात आर्वी येथील लखन बालासाहेब ईक्कर (वय  22) यास प्लास्टिकची गोळी लागली. ती टाकळी या गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात काढण्यात आली. दरम्यान पोलिस आणि आंदोलक यांच्यात बराच वेळ धुमश्‍चक्री सुरू होती. यावेळी राज्यरस्त्यावर ठिकठिकाणी झाडांची खोडे आडवी टाकून रस्ता बंदही केला होता. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांना प्रकरण हाताळण्यात बराच कालावधी लागला.  

यात पहिल्या दिवशी तीन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. 29 जुलै रोजी सकाळपासूनच तहसीलदार कडवकर व डीवायएसपी घेरडीकर हे घटनास्थळी तळ ठोकून होते. पोलिसांचीही मोठी कुमक यावेळी तैनात केलेली होती. यातील एक तुकडी गावात घरोघरी जाऊन आरोपींचा शोध घेत होती. यात आणखी दोन ते तीन जण ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

बाभळगाव फाटा; चक्का जाम आंदोलन

पाथरी : तालुक्यातील पेठबाभळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने पाथरी- सोनपेठ रोडवरील  बाभळगाव फाटा येथे दि.29 जुलै रोजी सकाळी साडेनऊ ते बारा या वेळेत सलग अडीच तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळी एकनाथ शिंदे, दीपक लिपने, भागवत कोल्हे, रणजित गिराम यांच्यासह सकल मराठा समाज बांधवांची  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पाथरीचे तहसीलदार  सखाराम मांडवगडे हे आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. लहान शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी पी.एन.गोवंदे, मंडळ अधिकारी बिडवे, पाथरीचे पोलिस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार सहायक पोलिस निरीक्षक देवकते,  कालापाड यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

ईरळद येथील बंधार्‍यात अर्धजल समाधी आंदोलन

मानवत : प्रतिनिधी

तालुक्यातील ईरळद येथील दुधना नदीवरील बंधार्‍यात मराठा आंदोलकांनी 29  जुलै रोजी अर्धजल समाधी आंदोलन केले. मागील आठ दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन चालू आहे. तहसील कार्यालयासमोर धरणे, बाजारपेठ बंद, मुंडण, चक्का जाम आदी आंदोलने करण्यात आली आहेत. शासनाचा निषेध म्हणून 29 जुलै रोजी ईरळद येथील दुधना नदीवरील बंधार्‍यात आंदोलकांनी अर्धजल समाधी आंदोलन केले. यावेळी तालुक्यातील मराठा समाजातील तरुण मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ईरळदच्या गावकर्‍यांनी आंदोलकांना नाश्त्याची सोय केली. आंदोलनस्थळी खबरदारी म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर महसूल विभागाच्या वतीने जीवरक्षक जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले  होते. आंदोलन संपल्यानंतर सर्व तरुण पुन्हा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यासाठी आले.