होमपेज › Marathwada › हिंगोली : व्यावसायिक संघर्ष हत्येला कारणीभूत 

हिंगोली : व्यावसायिक संघर्ष हत्येला कारणीभूत 

Published On: Jun 29 2018 12:11AM | Last Updated: Jun 29 2018 12:08AMहिंगोली : प्रतिनिधी

गोरेगाव टी पॉइंटजवळ पंक्‍चर काढणार्‍या कारागिराचा खून व्यावसायिक स्पर्धेतूनच झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी बुधवारी तपासाची चक्रे गतिमान करून शेजारी असलेल्या पंक्‍चर दुकानदारानेच शेख साहील याचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून बुधवारी रात्री उशिरा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय वाळले (रा.कनेरगाव नाका)  असे खून करणार्‍या आरोपीचे नाव आहे. बिहार राज्यातील मुजफरनगर येथील शेख साहील इसाक सिद्दीकी हा मागील दहा वर्षांपासून कनेरगाव नाका येथील गोरेगाव  टी पॉइंटवर वाहनांचे पंक्‍चर काढून उदरनिर्वाह करीत असे. त्यांच्या शेजारी असलेला संजय वाळले यांचे नेहमीच गिर्‍हाकावरून वाद होत असत. यातूनच वाळले याने मंगळवारी रात्री साहिल सिद्दीकी याच्या डोक्यात शस्त्राने वार करून खून केला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सिद्धेश्‍वर भोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार, गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कोरंटलू यांनी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केली. शेजारी विचारपूस केल्यानंतर हा खून संजय वाळले यानेच केल्याचे निष्पन्न झाले.तसेच घटनेनंतर वाळले हा फरार झाल्याचे समोर आल्यामुळे पोलिसांनी मृताची पत्नी शहजादी साहिल सिद्दीकी (वय 25) हिच्या फिर्यादीवरून संजय वाळले (रा.कनेरगाव नाका) याच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी अवघ्या सहा तासांत खुनाचा छडा लावला.आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गोरेगाव पोलिस रवाना झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सिद्धेश्‍वर भोरे यांनी दिली. दरम्यान घटनास्थळी अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी भेट देऊन तपासासंदर्भात सूचना दिल्या. तसेच आरोपी निष्पन्न केल्याबद्दल पोलिस कर्मचार्‍यांचे कौतुक केले.