होमपेज › Marathwada › सोयाबीन कुटारावर आळंबीचे उत्पादन

सोयाबीन कुटारावर आळंबीचे उत्पादन

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 2:07AMकळमनुरी : राहुल मेने

कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुर्मिळ व मोठी मागणी असलेले आळंबी (मशरूम) या पिकावर यशस्वी संशोधन करून, सोयाबीनच्या कुटारापासून अतिशय कमी उत्पादन खर्चात अळिंबीची निर्मिती केली आहे. निश्‍चितच  शेतकर्‍यांना आळंबी (मशरूम) निर्मितीपासून आर्थिक स्त्रोत निर्माण होण्यास मदत होईल.

आळंबी (मशरूम) हा एक बुरशीचा प्रकार आपल्याला दैनंदिन जीवनात पहावयास मिळतात. मात्र यातील काही जाती खाण्यायोग्य आहेत. आळंबी हे खाण्याकरिता अतिशय पौष्टिक असून यामध्ये अ, ब, क, ड हे जीवनसत्त्व असतात. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट प्रोटीन व 91% पाणी असते. यामुळे या आळंबीला मोठ्या प्रमाणावर शहरी भागात व पंचतारांकित हॉटेल्समध्ये मोठी मागणी असल्याने  आळंबी (मशरूम) ला महत्त्व प्राप्त झाले आहे.तोंडापूर येथील कृषी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणार्‍या ग्रामीण भागातील मनोहर राठोड, अभिनय शेंडे, किरण श्रीमनवार,  टि अमूल्या, अर्जुन शिंदे, अंकित राठोड यांच्यासह 16 विद्यार्थ्यांनी मशरूम या पिकाची निर्मिती करण्याचे ठरविले. याकरिता त्यांना पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एच. एन. कांबळे, प्राचार्य डॉ. एस. जी. जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले व संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी माने यांनी प्रेरणा दिली.    

मशरूम चे पीक नाजूक असल्याने पिके लागवड करताना हातात हातमोजे  व तोंडावर मास्क असणे आवश्यक असते जेणेकरून आपला संसर्ग या पिकाला होणार नाही ही काळजी या विद्यार्थ्यांनी घेतली. जवळपास एका पॉलिथिन बॅगमधील एकावेळेस अर्धा किलो मशरूम मिळाले अशी एकूण 50 बागांमधून 25 किलो उत्पादन आले. साधारण 400 ते 500 रुपये ओल्या मशरूमला नांदेड येथे भाव मिळाला तर सुक्या मशरूमची बाजारपेठेत किंमत हजार ते बाराशे रुपयांपर्यंत मिळते. अगदी कमी उत्पादनात व कमी कालावधीत येणारी ही मशरूम शेती शेतकर्‍यांना निश्‍चितच फायद्याची ठरणार आहे. याकरिता कृषी विद्यालय शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहे.