Fri, Jul 19, 2019 07:24होमपेज › Marathwada › विक्रेत्यांनाच खत घेण्यास अडचणी

विक्रेत्यांनाच खत घेण्यास अडचणी

Published On: May 29 2018 1:36AM | Last Updated: May 28 2018 11:16PMबीड : दिनेश गुळवे

रेशनवरील धान्य विक्रीच्या पाठोपाठ आता विक्रेत्यांनाच खत विक्रीही ई-पॉस (पाइंट ऑफ सेल) मशीनने विक्री करण्यास येत आहेत. या मशीनसाठी अनेकांनी गतवर्षीपासून अर्ज केले आहेत, मात्र अद्यापही त्यांना मशीन मिळालेल्या नाही.  खरीप हंगाम सुरू झाला आहे, मात्र मशीन मिळाली नसल्याने विक्रेत्यांना खत मिळणे कठीण झाले आहेत. खत विक्रेत्यांचे घोडे मशीनअभावी वेशीतच अडविले गेल्याने येत्या काळात खतांचा काळाबाजार होण्याची शक्यताही वाढली आहे. 

रेशनवरील धान्य वितरणास ई-पॉस मशीनमुळे लगाम लागला आहे. अशीच व्यवस्था आता खतांच्या विक्रीसाठीही सुरू करण्यात आली आहे. खरीप हंगाम सुरू झाला की, शेतकरी ऊस, कपाशी यासह इतर पिकांना मोठ्या प्रमाणात खत घालतात. पाऊस झाल्यानंतर शेतात खताची गाडी नेण्यास अडचणी येतात. त्यामुळे असे शेतकरी आताच खत खरेदी करून शेतातील गोठ्यात नेऊन ठेवतात. यासह खरीप हंगामात ऐनवेळी खतांचा तुटवडा होतो तर कधी काळाबाजार होत चढ्या दराने खत खरेदी करावे लागते. शेतकर्‍यांना असे अनुभव असल्याने आता खत विक्रीही ई-पॉस मशीनने करण्यात आली आहे. 

बीड जिल्ह्यात दोन हजार खत विक्रेते आहेत. या दुकानांमधून गतवर्षीपासूनच पॉस मशीनने खत विक्रीचे नियोजन होते, मात्र गतवर्षी ही योजना फेल गेल्याने यंदा मशीनशिवाय विक्रेत्यांनाच खत देण्याचे कंपन्या नाकारत आहेत. त्यामुळे मशीन मिळावी, यासाठी खत विक्रेते हेलपाटे मारीत आहेत. 

मशीनद्वारे खत खरेदी व विक्रीसाठी अगोदर विक्रेत्याला मोबाइलद्वारे एसएमएस आयडी काढणे गरजेचे आहे. आज घडीला जिल्ह्यातील एक हजार 588 खत विक्रेत्यांनी असे आयडी काढले आहेत. यातील एक हजार 116 विक्रेत्यांना मशीन मिळालेल्या आहेत. आता खरीप हंगाम सुरू झाला असून विक्रेत्यांनी खत खरेदी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत   मशीन मिळाल्या नाहीत, त्यांना नामांकीत कंपन्यांकडून  पैसे असूनही केवळ मशीनअभावी खत खरेदी करता येत नसल्याने व्यापारीही हैराण झाले आहेत.

मशीनवर आरोग्य पत्रिका

सध्या जिल्ह्यात सर्व शेतकर्‍यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार ज्या शेतकर्‍यांना जे खत आवश्यक आहे तेच व तेवढ्याच प्रमाणात दिले जाणार आहे. यासह जमिनीला आवश्यक आहे, त्याच प्रमाणात अनुदानित खत दिले जाणार असल्याचे भविष्यातील नियोजन आहे. सध्या मात्र शेतकर्‍यांना आधार कार्डद्वारे अंगठा देऊन खत घ्यावे लागणार आहे.

20 हजारांची मशीन घेणे आवाक्याबाहेर

जिल्ह्यातील खत विक्रेत्यांना शासनाकडून मोफत मशीन दिली जाते, मात्र व्यापार्‍यांना ही मशीन न मिळाल्याने त्यांना खत घेता येत नाही. अशा परिस्थितीत काही कंपन्या खत विक्रेत्यांकडून 19 हजार 500 रुपये घेऊन त्यांना मशीन देत आहेत. महागडी मशीन खरेदी करणे काही व्यापार्‍यांच्या आवाक्याबाहेर आहे. मशीन असलेले खत विक्रेते खरीपाची खरेदी करीत असले तरी मशीन नसलेले व्यापारी मात्र हातावर हात देऊन बसले आहे.