Mon, Apr 22, 2019 01:56होमपेज › Marathwada › पंतप्रधान पुरस्काराचे श्रेय जिल्हावासियांचे : पंकजा मुंडे

पंतप्रधान पुरस्काराचे श्रेय जिल्हावासियांचे : पंकजा मुंडे

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:15PMबीड : प्रतिनिधी

बीड जिल्ह्याचे नाव आज देशात गेले आहे. प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार माझ्या जिल्ह्याला मिळाला याचा मला अभिमान आहे. हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. पुरस्कार मिळणे हे श्रेय मी माझे समजत नाही तर हे श्रेय जिल्हावासियांचे असल्याच्या भावना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड येथे व्यक्त केल्या.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा हा संपूर्ण देशात अव्वल ठरला आहे. या योजनेची उत्कृष्ट आणि प्रभावी अंमलबजावणी केल्या बद्दल बीड जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार जाहीर झाला असून दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शनिवारी  पंकजा मुंडे या बीड येथे कार्यक्रमानिमित्त आल्या असता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा भाजप जिल्हापदाधिकारी, खासदार, सर्व आमदार, जि.प.अध्यक्षा, सभापती, सदस्य, सरपंच, कार्यकर्ते यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, ज्या जिल्ह्याची ओळख शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा, मुलींचा जन्मदर कमी असणारा जिल्हा अशी वाईट प्रतिमा आपल्याच लोकांनी देशासमोर करून ठेवली होती. आज या पुरस्काराने माझ्या जिल्ह्याची वाईट असणारी प्रतिमा ही देशासमोर उत्कृष्ट आणि चांगला जिल्हा म्हणून झाली आहे. याचा मला अभिमान आहे. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही, स्वतःला मी हे श्रेय घेणार नाही. हे सर्व श्रेय आपले खासदार, सर्व आमदार, त्याचबरोबर तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, आताचे जिल्हाधिकारी देवेंद्रसिंग आणि त्यांच्या सर्व अधिकारी वर्गाचे आहे. 

यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. आर. टी.देशमुख, आ.संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, जि. प. अध्यक्ष सविता गोल्हार, स्वप्नील गलधर, संतोष हंगे, आदित्य सारडा, सुभाष धस, प्रा. देविदास नागरगोजे, मधुसुदन खेडकर, शिवाजी मुंडे, राजेंद्र बांगर, कल्याण आखाडे, सलीम जहागीर, किरण बांगर, इर्षादभाई आदी उपस्थित होते.