Wed, Feb 20, 2019 12:46होमपेज › Marathwada › धनेगाव वीज उपकेंद्रावर शेतकर्‍यांचा रात्रभर ठिय्या

धनेगाव वीज उपकेंद्रावर शेतकर्‍यांचा रात्रभर ठिय्या

Published On: Apr 14 2018 1:42AM | Last Updated: Apr 14 2018 1:42AMबीड : प्रतिनिधी

केज तालुक्यातील धनेगाव येथील 33 केव्ही उपकेंद्र बंद करून उपकेंद्राच्या दारात शेतकर्‍यांनी गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केले. या उपकेंद्रातून करण्यात येणारा विद्युत पुरवठा   पंधरा दिवसांपासून सतत खंडित होत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते.  विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी दुपारी शेतकर्‍यांना भेटून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

धनेगाव येथील 33 केव्ही उपकेंद्रातून परिसरातील शेतीला विद्युत पुरवठा करण्यात येतो. हा विद्युतपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून सतत खंडित होत आहे.   शेतकर्‍यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना याची माहिती निवेदनाद्वारे देऊन विद्युतपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र  विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त  शेतकर्‍यांनी गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास धनेगाव येथील 33 केव्ही उपकेंद्रात आंदोलनास सुरुवात केली. गुरुवारी रात्री उपकेंद्रातून होत असलेला विद्युत पुरवठा बंद केला. याचा परिणाम केज धारुरसह अंबाजोगाई पाणीपुरवठा योजनांवर झाला.

विद्युत पुरवठा बंद झाल्याने या योजनेचा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास युसूफवडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंधारे यांनी आंदोलक शेतकर्‍यांना भेटून समजावण्याचा प्रयत्न केला. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाणीपुरवठा योजनाचा विद्युत पुरवठा चालू करण्यात आला. मात्र जोपर्यंत आमच्या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत  आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलक शेतकर्‍यांनी घेतली होती. शुक्रवारी दुपारी धनेगाव येथील 33 केव्ही उपकेंद्रास कनिष्ठ अभियंता चव्हाण यांनी भेट देऊन आंदोलक शेतकर्‍यांसोबत चर्चा करत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

 

Tags : Dhanegaon,  Dhanegaon news, Power supply close,