Sun, Nov 18, 2018 01:13होमपेज › Marathwada › गरीब विद्यार्थ्यांना मदतपेटीचा हात ! 

गरीब विद्यार्थ्यांना मदतपेटीचा हात ! 

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 21 2018 10:56PMपाटोदा : महेश बेदरे

शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत, मात्र योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. हीच बाब अधोरेखीत करीत पाटोदा येथील दत्ता देशमाने या युवकाने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी काहीतरी मदत करता यावी मदतपेटी सुरू केली आहे. नागरिकांनीही त्याला प्रतिसाद देत या पेटीत महिन्यातभरात तब्बल 7 हजारांची रक्कम जमा झाली. 

देशमाने यांनी बस स्थानक परिसरातील दुकानासमोर एक छोटी मदतपेटी ठेवली आहे.  समाजातील वंचित  घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी जी काही शक्य आहे ती मदत करावी, असा मजकूर सदरील मदत पेटीवर लिहून ठेवला आहे. मागील महिन्याभरापासून या पेटीत अनेकांनी  स्वेच्छेने मदत केली. त्यामुळे पेटीत 7 हजारांवर रक्कम जमा झाली आहे. जमलेल्या पैशातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच ज्यांच्याकडे गणवेश नाहीत त्यांना  गणवेश दिला जाणार आहेत .

ही मदतपेटी सुरू केल्यानंतर अनेकांनी यामध्ये एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये मदतीच्या स्वरूपात टाकण्यास सुरुवात केली. मात्र, कांदा व्यापारी असलेले धनंजय शेवाळे यांनी या  उपक्रमाला मोठा हातभार लावत 5 हजार रुपयांची मदत केली. त्या नंतर वडझरी येथील ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ सानप यांनी  उपक्रमास मदत केली आहे.