Tue, Apr 23, 2019 01:34होमपेज › Marathwada › नेत्यांच्या प्रतीक्षेत लग्नाचे मुहूर्त टळू लागले

नेत्यांच्या प्रतीक्षेत लग्नाचे मुहूर्त टळू लागले

Published On: May 10 2018 1:37AM | Last Updated: May 09 2018 10:50PMकेज : दीपक नाईकवाडे

कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर आपली सर्वकामे सोडून राजकीय व सामाजिक प्रतिष्ठीत मंडळींना विवाह सोहोळ्यास उपस्थित राहण्यासाठी धावाधाव करावी लागत असल्याचे चित्र एकीकडे तर दुसरीकडे राजकीय मंडळीचे विवाह सोहोळ्यासाठी आगमन होणार असल्याने मुहूर्तावर लग्न लागत नसल्याने लग्नासाठी आलेल्या वर्‍हाडी मंडळींना मात्र ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र विवाह सोहोळ्यात दिसून येत आहे. 

विवाह सोहळ्यास प्रतिष्ठित व राजकीय नेतेमंडळीसह सामाजिक नेतेमंडळीची उपस्थिती हा विवाह सोहोळ्यातील प्रतिष्ठेचा प्रश्न बनल्याने विवाहाची तारीख निश्चित करण्यात आल्या नंतर लग्नपत्रिका छापून आल्या की विवाह सोहोळ्याचे सर्वात अगोदर निमंत्रण राजकीय नेते मंडळीसह प्रतिष्ठितासह सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात येते. काही लग्न पत्रिकावर विवाह सोहोळ्यास कोणकोण दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत याचाही आवर्जून उल्लेख करण्यात येतो.

विवाहासाठी उपस्थित राहण्यासाठी राजकीय मंडळींना अनेक ठिकाणी आमंत्रित केले जात असल्याने विवाहाला उपस्थित राहण्यासाठी राजकीय मंडळींना धावाधाव करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे तर दुसरीकडे विवाह सोहोळ्यास राजकीय नेते मंडळीसह प्रतिष्ठितासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या प्रतीक्षेत विवाहासाठी काढलेला मुहूर्त कधी टळून जातो हे देखील वधू व वर पक्षाच्या मंडळीना समजत नाही.

नेतेमंडळीच्या प्रतीक्षेत मात्र लग्नासाठी आलेल्या मित्रमंडळीसह वर्हाडास ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र विवाह सोहोळ्यात दिसून येत आहे नेतेमंडळीनी विवाह सोहोळ्याच्या ठिकाणी हजेरी लावल्या नंतर त्यांच्या उपस्थितीत विवाह लावण्यात येतो मात्र असे असले तरीही एकाच दिवशी अनेक विवाह सोहोळ्यास उपस्थित राहण्यासाठी राजकीय मंडळींना धावाधाव करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.