Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Marathwada › परभणी पोलिसांच्या मध्यस्थीने जुळले १२३ संसार

परभणी पोलिसांच्या मध्यस्थीने जुळले १२३ संसार

Published On: Jan 31 2018 2:05AM | Last Updated: Jan 31 2018 12:54AMपरभणी : प्रतिनिधी

कौटुंबिक कलहाचे पर्यवसान घटस्फोटात होऊ नये यासाठी कौटुंबिक वाद मिटवण्याचे कार्य जिल्हा महिला पोलिस दक्षता समितीकडून चोखपणे करण्यात येत असल्याने ही समिती कौटुंबिक समस्या पीडित महिलांसाठी आधार बनली आहे. महिलांच्या मनातील ताणतणाव कमी करून त्यांचा तुटलेला संसार जुळवण्यात पोलिसांना यश येत आहे.

महिलांच्या कौटुंबिक व मानसिक प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासनाने पोलिसांच्या महिला दक्षता कक्षाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी कौटुंबिक समस्येने त्रस्त असलेल्या महिलांना समुपदेशन  करतात. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समिती कक्षात सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता कलटवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 7 महिला कर्मचारी कार्यरत आहेत. एका वर्षात 342 दाम्पत्यांसोबत चर्चा करून 123 जोडप्यांचा संसार जुळविला आहे. 2017 मध्ये दक्षता समितीकडे एकूण 342 अर्ज आले होते.

यातील एकूण 263 अर्ज निकाली काढून जोडप्यांना दिशा दाखवली आहे. कौटुंबिक कलहातून 498 दंडसंहितेच्या गुन्हे प्रकरणातील 57 जोडप्यांना समुपदेशित करण्यात आले. 17 जणांना न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. 

21 प्रकरणे कोर्टात दाखल करण्यात आली. 18 प्रकरणे संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग केली. 18 गैरहजर अर्जदारांचा पाठपुरावा करण्यात आला. यातील दाखल अर्जांपैकी 9 अर्ज रद्द करण्यात आले.  यामुळे समस्या पीडित महिलांना आधार मिळत असल्याची भावना विभक्‍त होऊन पुन्हा एकत्र आलेल्या जोडप्यांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.