बीड : प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतिवन गुरुकुल मधील 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. दुपारच्या जेवणानंतर हा प्रकार घडला आहे. तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आर्वी येथील शांतीवन गुरुकुलात 200 ते 250 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी दुपारी त्यांना नेहमी प्रमाणे जेवण देण्यात आले होते. जेवणाबरोबर शिळी जिलेबी खाण्यास देण्यात आली होती. या जिलेबिमुळेच विष बाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
दरम्यान विद्यार्थ्यांना शिळे जेवण दिल्याची चर्चाही दबक्या आवाजात नागरिक करत होते. जेवना नंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे या सारखा त्रास जाणवू लागला, परंतु काही किरकोळ कारणाने असे होत असेल असे समजून सुरुवातीला काना डोळा करण्यात आला, परंतु थोड्या वेळाने हा त्रास वाढत गेला. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून या विद्यार्थ्यांना तीन वाहनांमधून बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वसतिगृहात पहिली ते दहावीचे विद्यार्थीं राहतात. वसतिगृहातील जवळपास 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून 15 ते 20 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर शांतिवन गुरुकुलातील जेवणाच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेची चौकशीची मागणी होत आहे.