होमपेज › Marathwada › एक खून, चार आत्महत्यांनी जिल्हा हादरला

एक खून, चार आत्महत्यांनी जिल्हा हादरला

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 1:08AMबीड : पुढारी वृत्तसेवा

दहावी वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीच्या खूनासह चार जणांच्या आत्महत्येच्या घटनेने शनिवारी बीड जिल्हा हादरला. केज तालुक्यात खूनासह तिघांनी आत्महत्या केली. बीडजवळील बिंदुसरा धरण परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. 

ढाकेफळ येथील गणेश थोरात या तरुणाचे घराशेजारी राहणार्‍या सुनीता चटप या दहावीत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीशी प्रेमसंबंध होते. सुनीताला पाहण्यासाठी पाहुणे आले होते. यानंतर सुनीताशी आपला विवाह लावून द्या, अशी मागणी गणेश थोरात यांनी केली होती. विवाह लावून देत नसल्याचा राग आल्याने गणेश थोरात याने सुनीता चटप हिस घरातून ओढून नेऊन तिचा खून केला. या घटनेनंतर स्वत: गणेश थोरात यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने केजसह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. 

केज तालुक्यात नवविवाहितेने घेतले विष

तालुक्यातील युसूफ वडगाव येथील तनुजा शिवप्रसाद कोरसळे (वय 19) हिचा नऊ महिन्यापूर्वी विवाह झाला होता. तिने सासरी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. सासरकडील लोकांनी तिला अत्यवस्थ अवस्थेत अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तेथे तनुजाची प्रकृती अधिक खालावली आणि  उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. युसूफ वडगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.

औरंगाबादच्या तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद येथील बाळू दत्तात्रय आगळे (वय 36) या तरुणाने बीडजवळील बिंदुसरा धरण परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती होताच ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. बाळू  आगळे हा मूळ बीड शहरातील बार्शी नाका येथील राहणार असल्याचे सांगण्यात येते. सध्या तो कामानिमित्त औरंगाबाद येथे वास्तव्यास होता. त्याने आत्महत्या का केली, याची माहिती समजू शकली नाही.