Tue, Mar 26, 2019 22:02होमपेज › Marathwada › प्लास्टिकबंदीची हवा झाली गुल

प्लास्टिकबंदीची हवा झाली गुल

Published On: Jul 02 2018 1:45AM | Last Updated: Jul 01 2018 10:54PMबीड : प्रतिनिधी

प्लास्टिकबंदीची हवा पहिल्या आठवड्यातच गुल झाल्याचे चित्र बीड शहरात दिसून येत आहे. 23 ते 25 जून दरम्यान नगरपालिकेच्या पथकाने प्लास्टिकबंदी जोमाना राबविली. मात्र, नंतर त्याची तीव्रता कमी झाली. त्यामुळे व्यापार्‍यांनी येरे माझ्या मागल्या म्हणत कॅरीबॅगचा वापर सुरू केला आहे. 

प्लास्टिकचा पर्यावरणावर मोठा विपरित परिणाम होत असल्याने शासनाने प्लॉस्टिकबंदी जाहीर केली. बंदी जाहीर करताना प्लास्टिक वापरणारे व्यापारी-ग्राहक यांना जबर दंडाची तरतूदही केली आहे. या प्लास्टिक बंदीला समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. असे असले तरी जाणत्या नागरिकांकडून मात्र प्लास्टिकबंदीचे स्वागत होत असून त्यांनी कापडी पिशव्यांचा वापरही सुरू केल्याचे रविवारी बीड येथील आठवडी बाजारात दिसून आले. 

प्लास्टिक वापरणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी बीड नगर पालिकेने पथक तयार केले असून या पथकामध्ये सहा जणांचा समावेश आहे. या पथकाने 23 जूनपासून कारवाई केल्या आहेत. यामध्ये चार क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 25 हजारांवर दंड वसूल करण्यात आला आहे. असे असले तरी आणखीही अनेक व्यापारी प्लास्टिक पिशव्यांसह इतर वस्तुंचा वापर करीत आहेत.  

पहिल्या आठवड्यानंतरच प्लास्टिकबंदीची हवा गुल झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांकडून प्लास्टिक वापर होत असल्याने कारवाईचा फास आणखी आवळण्याची गरज आहे.
असे असले तरी पालिकेने कारवाई करीत तब्बल चार क्विंटल प्लास्टिक जमा केले असून यातून 25 हजारांवर दंड वसूल केला आहे. या पथकाच्या धास्तीने मात्र काही व्यापारी, ग्राहकांनी कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे.