होमपेज › Marathwada › गतवर्षीपेक्षा यंदा पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढला

गतवर्षीपेक्षा यंदा पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढला

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 22 2018 12:01AMबीड : प्रतिनिधी

गतवर्षी अगदीच नाममात्र पीक कर्ज वाटप झाले होते. यंदा मात्र शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाची गती जरा वाढलेले आहे. यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पीक कर्ज वाटण्यात आले आहे. आतापर्यंत चारशे कोटींचे कर्जवाटप झाले असून तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांना आणखी पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या आहेत. 

गतवर्षी शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. कर्जमाफीचे निकष वारंवार बदलण्यात आले होते. त्यामुळे कर्जमाफी कोणाला मिळते किंवा कोणाला नाही, यासाठी शेतकरी संभ्रमात होते. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे नवे-जुने झाले नव्हते, यासह शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपही अगदीच थोड्या प्रमाणात झाले होते. गतवर्षी दोन हजार कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात येणार होते. मात्र, कर्जमाफीच्या घोळामुळे तीनशे ते सव्वातीनशे कोटींचेच केवळ कर्जवाटप झाले होते. 

यंदा सात जूनपर्यंतच पीक कर्ज वाटप करण्याचे नियोजन होते, मात्र कर्जमाफीचा घोळ व नंतर पावसाने मारलेली दडी यामुळे बँकांनी हात आखडता घेतला होता. पीक कर्ज वाटपा संदर्भात वारंवर आढावा घेऊन सूचना दिल्याने बँकांनीही कर्जवाटपाची गती वाढविली आहे. त्यामुळे आतापर्यंत 56 हजार 717 शेतकर्‍यांना 379 कोटींचे कर्जवाटप झाले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामाठी दोन हजार 142 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे, मात्र आतापर्यंत केवळ18 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. या आठवड्यात पाऊस पडल्याने पीक कर्ज वाटपाची गती वाढण्यासंदर्भात सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांना आता खत, फवारणी व मशागतसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे बँकांनी जलद पीक कर्ज वाटप करावी, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे.