होमपेज › Marathwada › लोकसहभागाने वृक्षलागवड मोहीम यशस्वी होईल

लोकसहभागाने वृक्षलागवड मोहीम यशस्वी होईल

Published On: Jul 02 2018 1:45AM | Last Updated: Jul 01 2018 8:49PMपरभणी : प्रतिनिधी

वनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी वृक्षलागवड मोहीम राबवण्यात येत आहे. लोकसहभागामुळेच ही मोहीम यशस्वी होऊ शकते. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्‍तीने एक झाड लावून त्याची वाढ करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केले.

जिंतूर येथील नेमगिरी वनक्षेत्रात जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी शिवशंकर यांच्या हस्ते 1 जुलै रोजी झाला. यावेळी  उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, तहसीलदार सुरेश शेजूळ, विभागीय वन अधिकारी व्ही. एन. सातपुते, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) प्रेमानंद डोंगरे, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, वृक्षारोपणातून वनराजी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यासाठी जलसंधारण कामे, बांधबंधिस्ती, चर, नाला खोलीकरण आदी कामे केली जात आहेत. पाणी व वृक्षराजीमुळे भविष्यात पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होईल. शेतीसाठी याचा मोठा फायदा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. नेमगिरी परिसरात शेकडो एकर जमिनीवर वृक्ष लागवड करून येथे पर्यटनाच्या दृष्टीने येथील डोंगर भाग व तीर्थक्षेत्राचा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपयोग होईल असेही ते म्हणाले.

यावेळी सातपुते यांनी जिल्ह्यात वनक्षेत्र अतिशय कमी आहे. 1 टक्क्यापेक्षा कमी वनक्षेत्रात जिंतूर व गंगाखेड तालुक्यातील वनक्षेत्राचा समावेश होतो, असे सांगितले. विभागाच्या वतीने येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यात वाढ केली जाते. याचा परिणामस्वरूप येथे वृक्षराजी वाढीस लागलेली दिसते. दि. 1 ते 31 जुलै या वृक्ष लागवड मोहिमेच्या कालावधीत जिल्ह्यात 34 लाख वृक्षांचे रोपण केले जाणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी वनविभागाचे निवृत्त अधिकारी टी. ए. खान व आदींनी विचार व्यक्‍त केले. दरम्यान नागरिक, विद्यार्थी, अधिकारी-कर्मचार्‍यांनी वृक्षलागवडीसाठी सहभाग घेतला.